नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व आयआयटी रूरकीच्या निर्देशांनंतर नाशिक महापालिकेने मे. अलमण्डस् ग्लोबल सिक्युरिटीज् लिमिटेड या सल्लागार संस्थेमार्फत नमामि गोदा प्रकल्पासाठी २७८० कोटींचा सुधारित प्रकल्प आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय समितीमार्फत या सुधारित आराखड्याची छाननी केली जात आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या आराखड्याला शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे.
नाशिकला २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कंभुमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशकात ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याची योजना आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची संकल्पना तत्कालीन सत्तारूढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मांडल्यानंतर या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता देत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. सल्लागार संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करत केंद्राला सादर केला होता. या योजनेत नवीन मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीबरोबरच अस्तित्वातील जुन्या मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण प्रस्तावित आहे.
दरम्यान, जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत नाशिक शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण तसेच मलजलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्तावदेखील महापालिकेने शासनाला सादर केला आहे. या प्रस्तावांबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेचे संचालक अशोक बाबू यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. करंजकर यांना पाचारण करण्यात आले होते. नमामि गोदा व मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणाच्या दोन्ही प्रस्तावांतील कामांमध्ये साम्य असल्यामुळे दोन्ही योजनांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले होते. आयआयटी रुरकीनेदेखील काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने प्रकल्पासाठी सल्लागारामार्फत फेरसर्वेक्षण करत सुधारित आराखडा तयार केला आहे. पुढील आठवड्यात सदर आराखडा शासनाला सादर केला जाणार असून, महिनाभरात या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळविली जाणार आहे.
असा आहे नमामि गोदा प्रकल्प…
महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती क्षमता वाढ व सुधारणा, अडविणे व वळविणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिसारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित झालेल्या व होणाऱ्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी सिवर लाइनचे जाळे टाकण्याची कामे करणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा नमामि गोदा प्रकल्पात समावेश आहे.
असा होणार खर्च…
* केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार विद्यमान मलनिस्सारण केंद्रांचे अद्ययावतीकरण आणि सक्षमीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे – ३९८.१८ कोटी.
* जुन्या मलवाहिका बदलून नवीन अधिक क्षमतेच्या मलवाहिका टाकणे व नव्याने विकसित झालेल्या भागात मलवाहिकांचे जाळे तयार करणे – ९२७.३४ कोटी.
* नवीन मलनिस्सारण केंद्रांची उभारणी – ६२२.०९ कोटी.
* नदीघाट विकास व सौंदर्यीकरण- ८३२.६३ कोटी.
छाननीसाठी प्रशासकीय समिती
‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा व मलनिस्सारण) संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) अविनाश धनाईत यांच्या सहअध्यक्षतेखाली बांधकाम, मलनिस्सारण, पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची १२ सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. सल्लागार कंपनीमार्फत सादर केलेल्या सुधारित आराखड्यासह विविध कागदपत्रांची छाननी करून मंजुरीसाठी सादर करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
The post सुधारित आराखडा तयार; पुढील आठवड्यात शासनाला सादरीकरण appeared first on पुढारी.