सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा ! महिलेस परत मिळाली हरवलेली सोन्याची पोत

सोन्याची पोत (1)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयात नातलगासाठी भेटण्यासाठी आलेल्या महिलेची सोन्याची पोत रुग्णालयात गहाळ झाली होती. सुरक्षारक्षकास ती पोत आढळून आल्याने त्यांनी ती प्रामाणिकपणे रुग्णालयीन प्रशासनाकडे दिली. त्यानंतर महिलेने पोत ओळखून ताब्यात घेतली. हरवलेली पोत सुरक्षारक्षकांच्या प्रामाणिकतेमुळे परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यात आंनदाश्रु तराळले.

दसकवाडी येथील अर्चना चव्हाण यांचे नातलग प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या भेटीसाठी चव्हाण रविवारी (दि.३१) जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रसूती कक्षात आल्या. येथे त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची पोत पडली. ही बाब त्यांना समजली नव्हती. दरम्यान, तेथे सेवा बजावणारे सुरक्षारक्षक वाल्मिक टिळेकर यांना ही सोन्याची पोत सापडली. त्यांनी सुपरवायझर रमेश गाडेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांना ही बाब सांगितली. त्यानंतर पोत हरवलेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयाकडून शोध घेण्यात आला. रुग्णालयातील स्पिकरवर सोन्याची चेन हरवलेल्या महिलेने रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. ही बाब अर्चना चव्हाण यांना समजली. त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात संपर्क साधून पोत ओळखली. डॉ. पवार यांच्यासह उपस्थित डॉक्टर व सुरक्षारक्षकांनी यांच्या हस्ते चव्हाण यांना पोत परत करण्यात आली. पोत परत मिळाल्याने चव्हाण यांच्यासह नातलगांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व सुरक्षारक्षकांचे आभार मानले.

—–

प्रामाणिक सुरक्षारक्षकामुळे जिल्हा रुग्णालयात हरवलेली सोन्याची पोत महिलेला परत करता आली. त्यामुळे रुग्ण व नातलगांमध्ये रुग्णसेवेसह सुरक्षेची भावना आहे. डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल

हेही वाचा –

The post सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा ! महिलेस परत मिळाली हरवलेली सोन्याची पोत appeared first on पुढारी.