सुरक्षारक्षकाने पोलिओ डोस पाजल्याच्या प्रकरणावर अखेर पडदा! ‘त्या’ दोन आरोग्यसेविकांचा माफीनामा! 

सिडको (जि.नाशिक) : ‘दो बूंद जिंदगी के’ म्हणत पोलिओ डोस लसीकरणाच्या दिवशी चक्क सुरक्षारक्षकाने बालकांना डोस पाजल्याची घटना ‘सकाळ’ने उघडकीस आणली होती. त्या वृत्ताची दखल घेत महापालिका वैद्यकीय विभागाचे धाबे दणाणले होते.

 'त्या’ दोन आरोग्यसेविकांचा माफीनाफा!

लॉकडाउननंतर प्रथमच पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील पेठे शाळेत या मोहिमेचे केंद्र होते. या केंद्रात आरोग्यसेविका जेवण करत असताना, चक्क तेथील सुरक्षारक्षकाने मुलांना पोलिओ डोस पाजल्याचे छायाचित्र व व्हिडिओच्या माध्यमातून ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. त्याची दखल घेत महापालिका आरोग्य विभागाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर संबंधितांनी खुलासा पाठवत व प्रत्यक्षात या प्रकरणाबाबत अक्षम्य चूक झाल्याचे कबूल करून यापुढे अशी चूक होणार नाही, अशी माफी मागितली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे. 

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

प्रकरणावर अखेर पडदा

या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित ‘आरोग्यसेविकांना’ महापालिकाने नोटिसा बजावून खुलासा मागितला होता. या खुलाशात आरोग्यसेविकांनी आपली चूक कबूल करून माफीनामा दिल्याने या प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे. 

संबंधित आरोग्यसेविकांना नोटिसा पाठविल्या होत्या. त्याचा खुलासाही प्राप्त झाला आहे. यापुढे ‘अशी चूक होणार नाही’, असा माफीनामा त्यांनी दिला आहे. तसेच सुरक्षारक्षकाला आम्ही जागेवर प्रशिक्षणही दिल्याचे आरोग्यसेविकांनी सांगितले. 
-डॉ. प्राजक्ता कडवे, वैद्यकीय अधिकारी, श्री स्वामी समर्थ रुग्णालय, महापालिका, सिडको 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार
मनपा रुग्णालयाचा भोंगळ कारभार 
यापूर्वी याच मनपा रुग्णालयातील प्रवेशद्वारावर गरीब महिलेची रिक्षातच प्रसूती झाली होती. त्यानंतर प्रसूतीस नकार दिल्याने एका महिलेचे शिवशक्ती चौकात रस्त्यातच तेथील नगरसेविका व महिलांनी बाळंतपण केले होते. त्यानंतर आता सुरक्षारक्षकाने शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले. वेळोवेळी रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड होत असताना, महापालिका अधिकारी वर्ग झोपा काढतो का, असा संतप्त सवाल रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.