सुरगाणा येथील तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले; चौकशीतून धक्कादायक खुलासा

सुरगाणा (जि. नाशिक) : घाटमाथ्यावरील तरुणाच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखा व सुरगाणा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मुख्य संशयित आरोपीस पकडण्यात यश मिळाले आहे. रोटी फाट्याजवळ १ मार्चला वांजूळपाडा येथील तरुण राजेंद्र बागूल याचा मृतदेह आढळला होता.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, कळवणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, ग्रामीण अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पोलिस तपास सुरू असताना सुरगाणा तालुक्यातील राजभुवन येथील मधुकर ऊर्फ चम्या राऊळ (वय २५) याचे नाव समोर आले. शोध सुरू असताना मधुकर सटाणा तालुक्यातील तळवाडे दिगर येथे सापडला. त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली.

डोक्यात दगड घालून खून

त्याने सांगितले, की २८ फेब्रुवारीला तो व त्याचा मेहुणा दोघे रोटी येथे वरातीत नाचण्यासाठी गेले होते. या वेळी वरातीत नाचण्यावरून त्यांचा राजू ऊर्फ राजेंद्र बागूल (रा. वांजूळपाडा) याच्याशी वाद झाला होता. त्यानंतर तो मोटारसायकलवर राजेंद्रला बसवून गाळपाडा येथे दारू पिण्यासाठी बहाणा करून घेऊन गेला. गाळपाडा येथून परत येताना हरणटेकडी शिवारात रोटी फाटा येथे त्याने त्यास दगडाने ठेचून नालीत टाकले आणि डोक्यात मोठा दगड घालून खून केल्याची कबुली त्याने दिली.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

रोटी येथे वरातीत डीजेच्या तालावर ठेका धरलेला असताना किरकोळ धक्का लागल्याने नाचण्याच्या किरकोळ कारणावरून हत्येचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  दोन दिवसांत या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेचे एपीआय वाघ, एएसआय मुंढे, महाले, तुपलोंढे, खांडवी, चालक म्हसदे तसेच सुरगाणा येथील पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोडखे, सागर नांद्रे, अनिल वाघ, गोतुरणे, गवळी आदींनी केलेल्या तपासात यश मिळाले. या प्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, तपास सुरू आहे. 

व्हिडिओवरून संशयिताचा माग 

घटनेच्या रात्री रोटी येथे वरातीत मृत राजेंद्र बागूल व संशयित डीजेवर नाचताना तसेच नाचणाऱ्यांच्या गर्दीतून बाहेर पडतानाचा व्हिडिओ एकाच्या मोबाईलमध्ये पोलिस कर्मचारी गोतुरणे यांना तपास करताना दिसला. त्यावरून संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळाले. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा