सेवा पंधरवडा : नाशिकमध्ये आरोग्य सुविधा आणखी वाढवणार

सिकल सेल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सेवाभावनेतून नागरिकांची कामे करण्यासाठी सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. जिल्ह्याचा विकास साधताना आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात रविवारी (दि. 2) सिकलसेल आजार निदान व उपचार शिबिर तसेच दिव्यांगांना साहित्यवाटप कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी ना. डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, डॉ. सुनील राठोड, डॉ. अनंत पवार, डॉ. नीलेश पाटील आदी उपस्थित होते. ना. डॉ. भारती पवार म्हणाल्या की, देशाचा विकास करत असताना शिक्षण व आरोग्य व्यवस्था मजबूत असणे गरजेचे आहे. तसेच तरुणांना व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखणे, हे सजग नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सिकलसेल हा आनुवंशिक आजार असल्याने त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहेत. या आजाराबाबत जनजागृती करून पुढच्या पिढीत हा आजार जाऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ना. डॉ. पवार यांच्या हस्ते श्रवणयंत्रांचे व कुबड्यांचे वाटप करण्यात आले. सिकलसेलबाबत रक्त तपासणीसाठी स्टॉल उभारण्यात आला होता.

आरोग्य यंत्रणा कार्यरत : ना. डॉ. पवार
कुपोषणाबाबत सर्वच आरोग्य यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका, आशा यांच्या मदतीने ग्रामीण भागात प्रत्येक गरोदर मातेची तपासणी करून, मूल गर्भात असतानाच त्यांना पोषक आहार देण्यावर भर देण्यात येत आहे, असे ना. डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post सेवा पंधरवडा : नाशिकमध्ये आरोग्य सुविधा आणखी वाढवणार appeared first on पुढारी.