सोनिया गांधी यांच्याविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेसची निदर्शने

कॉंग्रेस आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजप प्रणीत केंद्र सरकारने ईडीचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धतीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२१) काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तर महाराष्ट्र विभागीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीने जोरदार आक्षेप घेतला. ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान मोदी सरकारकडून सातत्याने करत आहे. केंद्र सरकारच्या हुकुमशाहीला काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भीक घालणार नाही. उलट ते पेटून उठतील, असे पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, हिरामण खोसकर, शिरिष चौधरी, राजाराम पानगव्हाणे, डॉ. शोभा बच्छाव, प्रदीप पवार, सुभाष सांगळे, प्रताप ओहळ, डॉ. दरबारसिंग गिरासे, गुलाब खोतकर, आबा पाटील, शाहू खैरे, सुरेश मारू, ज्ञानेश्वर काळे, रमेश कहांडोळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, वत्सला खैरे, दिगंबर गिते, संदीप गुळवे, रमेश जाधव आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्याने महागाईचा भडका उडणार आहे. महागाईसह इतर मुद्द्यांकडे जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी विरोधकांना लक्ष केले जात आहे. विरोधी पक्षनेत्यांवर विविध कारवाईच्या माध्यमातून बदनामी करत चुकीचा अजेंडा राबविण्याचे धोरण केंद्राने आखले आहे. या विरोधात काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.

– बाळासाहेब थोरात, विधिमंडळ नेते (काँग्रेस)

हेही वाचा :

The post सोनिया गांधी यांच्याविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.