सोने स्वस्त झाल्याने लग्नघरची “चांदी’, मार्च महिन्यात सहा मुहूर्त

लग्न,www.pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे

२४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ५८ हजार ८०० रुपयांचा उच्चांकी दर नोंदविणारे सोन्याचे दर आता झपाट्याने खाली येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सोने तब्बल तीन हजार चारशे रुपयांनी स्वस्त झाल्याने, लग्नसराईचा उत्साह द्विगुणित होणार आहे. मार्च महिन्यात सहा मुहूर्त असल्याने, सोने खरेदीसाठी सराफ बाजारात यजमानांची गर्दी दिसून येत आहे.

ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दराने उसळी घेतल्याने, लग्नसोहळ्यातील उत्साहावर विरजण पडले होते. नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ पासून सोने-चांदीच्या दराने उसळी घेण्यास सुरुवात केली. नेमक्या याच महिन्यात लग्नांचे सर्वाधिक मुहूर्त होते. त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसली. दरम्यान, मार्च महिन्यात लग्नाचे सहा मुहूर्त असून, सोने-चांदीचे दर कमी होऊ लागल्याने यजमानांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ५८ हजार ८०० रुपयांवर गेला होता. आता दर ५६ हजारांवर आला आहे. तर २२ कॅरेट प्रति १० ग्रॅमचा दर ५१ हजारांवर आला आहे. चांदीच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. चांदीचे दर ७० हजारांहून ६२ हजारांवर आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने देशातील सराफा बाजारात त्याचा परिणाम दिसून येत आहे. नाशिकच्या सराफ बाजारात सोने-चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, पुढच्या काळात सोने-चांदीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

मार्चमध्ये लग्नाचे मुहूर्त

मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच विवाहाचे मुहूर्त आहेत. १, ५, ६, ९, ११ आणि १३ मार्च हे सर्व मुहूर्त शूभ असल्याने विवाहासाठी यापैकी एक मुहूर्त निवडू शकता. या कालावधीत गुरू आणि शुक्राचा उदय असल्याने विवाहासह अन्य शुभकार्यं करता येऊ शकतात, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.

हेही वाचा : 

The post सोने स्वस्त झाल्याने लग्नघरची "चांदी', मार्च महिन्यात सहा मुहूर्त appeared first on पुढारी.