सोन्यासारख्या कोबीला १५ पैसे किलोचा दर! हतबल शेतकऱ्याने पिकात सोडली मेंढरे

नगरसूल (जि. नाशिक) : पोटच्या लेकरागत वाढवलेल्या सोन्यासारख्या जोमदार कोबीच्या उभ्या पिकात काळजावर दगड ठेवून जड अंतःकरणाने अनकाई येथील शेतकऱ्याने मेंढरे सोडली. बाजारात कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी आदी भाज्यांना कवडीमोल भाव मिळतोय. स्वप्न चक्काचूर झाल्याने शेतकरी अक्षरश: हतबल झाले आहेत. 

अतिवृष्टीमुळे यंदा खरिपात कांदा, मका, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत चांगल्या उत्पन्नाची हिरवीगार स्वप्न रंगवून अनेक शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेण्यासाठी कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी, मेथी आदी भाज्यांची लागवड केली. मात्र, सर्वत्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्च तर दूरच, केवळ येवला, मनमाडपर्यंतचा वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्यामुळे अनकाई (ता. येवला) येथील शेतकरी दगू सोनवणे यांनी काढणीला आलेल्या कोबीच्या जोमदार पिकात मेंढ्या सोडल्या. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

दगू सोनवणे यांनी दरसवाडी येथील नर्सरीमधून कोबीची रोपे विकत आणून दीड एकरात पीक घेतले. मशागत, खत, पाणी व मेहनतीने जोमदार पीक तयार केले. चांगला भाव मिळेल, या आशेने स्वप्न रंगवले. मात्र, बाजारात सध्या भाज्यांचे दर घसरल्याने सोनवणे यांनी कोबीच्या पिकात मेंढ्या सोडून मन:स्ताप व संताप व्यक्त केला. 

तीन किलोच्या एका कोबीला फक्त पन्नास पैसे दर मिळाला. म्हणजेच प्रतिकिलो पंधरा पैसे दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसे जगायचे अन्‌ शेती करायची कशी. सरकारने आता आधार द्यावा. 
-नवनाथ सोनवणे, शेतकरी, चांदगाव, ता. येवला 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा