सोयगावला चोरट्यांचा धूमाकूळ; वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत

सोयगाव (नाशिक) : महिनाभरापासून सोयगावसह परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्री चोरटे संधी साधून बंद घरात घुसून चोरी करीत आहेत. तर अनेकदा दिवसाढवळ्या घरासमोरील दुचाकी लंपास होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. 

सोयगावसह नववसाहत कॅम्प भागाला कळवण, सटाणा, देवळा हा परिसर जवळ असल्याने याच भागातील अनेक शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार व इतर घटक स्थायिक झाले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठीही अनेक जण याच परिसरात राहतात. सोयगाव नववसाहतीत बंद घर बघून चोरटे घरावर डल्ला मारत आहेत. तीन दिवसांपूर्वी तुळजाई कॉलनी परिसरात रात्री पाच घरे फोडून चोरी केली. तर दौलतनगर भागात गायीची चोरी झाली. दिवसेंदिवस सोयगाव भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसा चोर परिसरात पाळत ठेवून रात्रीच्या वेळी घरावर डल्ला मारत आहेत. या चोरट्यांकडे शस्र असल्याचेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी श्रीकांत कापडणीस यांची सायंकाळी सातच्या सुमारास लॉक केलेली दुचाकी घरासमोरून चोरीला गेली. या दुचाकीचा अद्यापही तपास लागलेला नाही. वाढत्या चोऱ्यांमुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. या भागात रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. 
 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

महापालिकेने कारवाई करण्याची गरज 

मोकळ्या भूखंडावर काटेरी झुडपे असल्याने चोरटे या झुडपांचा सहारा घेत सावज टिपण्याचा प्रयत्न करतात. तशी चाहूल लागताच चोरटे पोबारा करतात. त्यामुळे मोकळ्या भूखंडाच्या मालकांवर महापालिकेने कारवाई करण्याची गरज आहे. 

महिन्यापासून सोयगावसह परिसरात दुचाकी, सायकल, घरफोडी आदी प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी चोर शस्र घेऊन फिरल्याचे ऐकण्यात आहे. 
- डॉ. सचिन बोरसे, नागरिक, सोयगाव 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

सायंकाळी घरासमोर दुचाकी उभी केली आणि घरात गेलो. अगदी काही मिनिटांतच घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. गेल्या महिनाभरापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 
- श्रीकांत कापडणीस, रहिवासी