सोयाबीनचे दर आजपर्यंतच्या ऐतिहासिक उच्चांकावर! उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : तेल निर्मिती व पशुखाद्यासाठी लागणाऱ्या सोयाबिनने आजपर्यंतचा उच्चांकी दर गाठला आहे. ब्राझील, अर्जेंटीनामध्ये अत्यल्प उत्पादन, मध्य प्रदेशमध्ये पावसाने झालेल्या नासाडीमुळे सोयाबीनचा मागणीच्या तुलनेत मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम दरावर दिसून येत आहे. सोयाबीनने आजपर्यंत दराचे सर्व विक्रम मोडीत काढत ऐतिहासिक उच्चांकावर पोहचले आहे.

उत्पादक शेतकरी सुखावला

पालखेड उपबाजारात आज तब्बल साडेसहा हजार रूपये प्रतिक्विंटल अशा दराने सोयाबीनचे लिलाव पुकारले गेले. सोयाबीनला अक्षरश: सोन्याचा भाव आला आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या ३८८० रूपये आधारभूत किमतीपेक्षा अडीच हजार रूपये अधिक भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निफाड तालुक्यात खरिप हंगामात सर्वाधिक दहा हजार एकरवर सोयाबीनची पेरणी झाली. द्राक्ष, ऊस या नगदी पिकांनी निराशी केली असताना सोयाबीनने मात्र मोठा आधार दिला आहे. गेल्या वर्षापर्यंत सोयाबीनचे दर तीन हजार रूपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेले नाही. यंदा मात्र सुरुवातीपासून दर साडेचार हजार रूपयांच्या वर राहिले. विशेष म्हणजे हमीभावात व व्यापाऱ्यांकडून होणारे सौदे यात मोठा फरक राहिला. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

१०० चे १५० टनाची आवक

यंदा सोयाबीन तुटवड्याची चिन्ह निर्माण झाली आहे. त्यामुळे तेल, ढेप निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून साठेबाजी सुरू आहे. कारण, ऑक्टोबरपर्यंत नव्याने सोयाबीन येणार नाही. पुढील सात महिन्यात उत्पादनांसाठी सोयाबीनचे साठे होत आहे. त्या तुलनेत भुसार मालाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालखेड उपबाजारात १०० चे १५० टनाची आवक सुरू आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने व्यापाऱ्यांकडून उच्चांकी भावाने लिलाव पुकारले जात आहे. पालखेड उपबाजारात अवघी ४० क्विंटल सोयाबीनची आवक होऊन सर्वाधिक ६६०० रूपये दराने लिलाव झाले. दराच्या झळाळीने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

परदेशात व देशातंर्गत यंदा सोयाबिनचा तुटवडा आहे. नवीन माल येण्यास सात महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे यंदा दर साडेसहा हजार रूपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहचले. 
- मंगेश छाजेड, व्यापारी, पालखेड