सोयाबीन दराचा ऐतिहासीक उच्चांक! अक्षरशः सोन्याचा भाव मिळाल्याने उत्पादकांमध्ये आनंद 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ब्राझील, अर्जेंटिनामध्ये अत्यल्प उत्पादन, मध्य प्रदेशात पावसाने नासाडी झाल्यामुळे सोयाबीनच्या मागणीच्या तुलनेत मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम थेट दरावर दिसून येत आहे. सोयाबीनने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडून काढत ऐतिहासिक उच्चांकावर पोचले आहेत.

पालखेड उपबाजारात तब्बल साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल अशा दराने सोयाबीनचे लिलाव पुकारले गेले. सोयाबीनला अक्षरशः सोन्याचा भाव आला आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या तीन हजार ८८० रुपये आधारभूत किमतीपेक्षा एक हजार २०० ते एक हजार ५०० रुपये अधिक भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

दराच्या झळाळीने शेतकऱ्यांमध्ये समाधान

निफाड तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक दहा हजार एकरवर सोयाबीनची पेरणी झाली. द्राक्ष, ऊस या नगदी पिकाने निराशा केली असताना सोयाबीनने मात्र मोठा आधार दिला आहे. गत वर्षापर्यंत सोयाबीनचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेले नाहीत. यंदा मात्र सुरवातीपासून दर साडेचार हजारांच्या पातळीच्या वर राहिले. विशेष म्हणजे हमीभावात व व्यापाऱ्यांकडून होणारे सौदे यात मोठा फरक राहिला. यंदा सोयाबीन तुटवड्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे तेल, ढेप निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून साठे करणे सुरू आहे. ऑक्टोबरपर्यंत नव्याने सोयाबीन येणार नाही. पुढील सात महिन्यांत उत्पादनांसाठी सोयाबीनचे साठे होत आहेत. त्यातुलनेत भुसार मालाचे आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या पालखेड उपबाजारात १०० चे १५० टनाची आवक सुरू आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने व्यापाऱ्यांकडून उंच भावाने लिलाव पुकारले जात आहेत. आतापर्यंतचे सर्वाधिक पाच हजार ५०० रुपये दराने लिलाव झाले. दराच्या झळाळीने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

परदेशात व देशातंर्गत यंदा सोयाबीनचा तुटवडा आहे. नवीन माल येण्यास सात महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे यंदा दर साडेपाच हजारांच्या ऐतिहासिक पातळीवर पोचले. 
- मंगेश छाजेड, व्यापारी, पालखेड