सोयीच्या आरक्षणाने सत्ताधाऱ्यांचा जीव भांड्यात! अंतर्गत शह-काटशह रंगणार  

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : सरपंचपदाचे आरक्षण आपल्या सोयीचे निघावे, यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या पॅनलच्या नेत्यांचा जीव गुरुवारी (ता.२८) काहीसा भांड्यात पडला. पिंपळगाव बसवंत परिसरातील दहापैकी नऊ ग्रामपंचायतींमध्ये काठावर बहुमत असलेल्या गटाला सोयीचे आरक्षण निघाले आहे. आरक्षण जाहीर झाले; पण ते स्त्री की पुरुष पैकी कुणासाठी आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असल्याने बेहेडमध्ये धडधड वाढली आहे. काठावर बहुमताच्या ठिकाणी एक सरपंच पदासाठी तीन ते चार दावेदार असल्याने अंतर्गत शह-काटशह रंगणार आहे. 

सत्ता मिळविलेल्या गटाचा जीव भांड्यात
शिरवाडे वणी येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर होत अशोक निफाडे गटाने सहा जागा जिकून काठावर सत्ता मिळविली. सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने निफाडे गटाचा सरपंच अटळ आहे. रानवडमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण निघाले असून, त्या जागेवर अपक्ष संगीता गायकवाड यांनी बाजी मारल्याने त्या प्रथम नागरिक होऊ शकतात. अंतरवेलीत सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने मंदा कोकाटे यांची निवड निश्‍चि‍त मानली जात आहे. बेहेडमध्ये मात्र ओबीसी आरक्षण आहे. पण ते स्त्री राखीव झाले तर अल्पमतातील गटाकडे सरपंचपद जाऊ शकते. उंबरखेडला ओबीसी आरक्षण असल्याने उद्धव निरगुडे यांच्या सत्ताधारी गटाकडे स्त्री व पुरुष असे दोन्ही सदस्य आहेत. सर्वसाधारण जागेसाठी खुल्या असलेल्या आहेरगाव येथे रामभाऊ माळोदे गट, मुखेड येथे अमोल जाधव गट, वडाळीनजीक दौलत कडलग गट यांसह ओणे, कारसूळ, दात्याणे येथे स्त्री किंवा पुरुष सदस्य असल्याने सत्ता मिळविलेल्या गटाचा जीव भांड्यात पडला आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल
गटांतर्गत स्पर्धा 
सरपंच पदाचे आरक्षण स्त्री किंवा पुरुषाचे असले तरी सदस्य असल्याने पॅनल प्रमुखांना काहीसे हायसे वाटले. पण, एका सरपंचपदासाठी दोन ते चार सदस्य इच्छुक असल्याने सत्ताधारी गटांतर्गत स्पर्धा वाढणार आहे. विरोधी गट हा बहुमत मिळविलेल्या गटातील काही सदस्यांना ऑफर देऊन तोडफोड करू शकतो. त्यामुळे सरपंच निवड होईपर्यंत त्या गावातील राजकारण धगधगत राहील. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपळगावसाठी सरपंचपद सर्वसाधारण 
२०२२ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचेही आरक्षण जाहीर झाले आहे. राज्यात अव्वल असलेल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीसाठी पुढील आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘काटे की टक्कर’ बनकर व मोरे घराण्यामध्ये दिसेल. पालखेड व कसबे सुकणे येथे ओबीसीसाठी आरक्षित आहे.