सोशल मीडिया वापरताना केवायसी हवेच – पोलिस अधीक्षक सचिन पाटील

चांदोरी (जि. नाशिक) : सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करतात. सोशल मीडिया फोफावत चालला असून, अनेकांची होणारी फसवणूक लक्षात घेता त्यालासुद्धा केवायसीची गरज आहे. त्यामुळे खोट्या नावाचा वापर करून हॅकिंग व फसवणूक करणाऱ्यांना आळा बसेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले. नाशिक बार असोसिएशनतर्फे सायबर क्राइमविषयी झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. 

पाटील यांनी वाढत्या ऑनलाइन वापरामुळे दररोज ऑनलाइन गुन्हे आणि फसवणुकीबाबत माहिती दिली. फोनवर आपला पिन नंबर द्यायचा नाही. येणाऱ्या काळात प्रगत तंत्रज्ञान विकसित होऊन गाड्या व इतर उपकरणेसुद्धा इंटरनेटवर चालणार आहेत. त्यादृष्टीने भविष्यातील धोके आताच लक्षात घेऊन सतर्क राहावे, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.प्रारंभी अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी श्री. पाटील यांचे स्वागत केले. ॲड. जालिंदर ताडगे यांनी प्रास्ताविक केले. नवीन सनद घेतलेल्या वकिलांचे स्वागत करून त्यांना साहित्यवाटप करण्यात आले. या वेळी जयंत जायभावे, शरद गायधनी, संजय गिते, अविनाश भिडे, सोनल कदम, कमलेश पाळेकर, महेश लोहिते, शरद मोगल, हर्षल केंगे आदींसह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

ऑनलाइन काय काळजी घ्यावी? 
कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्याक्षणी त्वरित बँकेत जाऊन तक्रार करावी. पोलिस ठाणे गाठून त्याची प्रत द्यावी. शिवाय सायबर पोलिस, स्थानिक पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक कार्यालयाला प्रत मेल करावी. सर्वच प्रकारचे पिन सतत बदलत राहणे, ज्या वेबसाइटवरून बँकेचे व्यवहार करतात ते सुरक्षित आहे का, याची खातरजमा होणे गरजेचे आहे. वैयक्तिक वाय-फाय वापरताना काळजी घ्यावी. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी 

राज्यात पहिलाच उपक्रम 
पोलिस आणि वकील संघ यांनी एकत्र येऊन प्रगत होणाऱ्या इंटरनेटमुळे त्याचे होणारे परिणाम यावर जनजागृती केली. पाटील यांनीदेखील भारतातील मुख्य सायबर घटना व त्याचा केलेला पर्दाफाश याचे अनेक दाखले देत सतर्कता कशी बाळगावी, यावर भाष्य केले. त्यामुळे नवोदित वकिलांना त्यांच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणींसाठी हे सत्र उपयोगी राहील, असा विश्‍वास वकील संघाने व्यक्त केला.