सौर ऊर्जा क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल : ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सौर ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल असून, येत्या 50 वर्षांत या क्षेत्राला मोठी मागणी वाढणार आहे. केमिकल, फार्मा, हायड्रोजन यात भविष्यात भारत जगाचे नेतृत्व करेल. चीनवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा आणि रसायने व खत राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले.

सातपूर येथील नासिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या सभागृहात उद्योजकांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, महाराष्ट्र चेंबरचे संजय सोनवणे, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहन उपासनी, लघुभारतीचे माजी अध्यक्ष संजय महाजन, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, रवींद्र झोपे, विरल ठक्कर, विजय जोशी आदी उपस्थित होते. ना. खुबा म्हणाले की, कोरोना काळात धास्तावलेल्या उद्योजकांना मोदी सरकारने २२ लाख कोटींची मदत केल्याने भारताची अर्थव्यवस्था तग धरून आहे. ही मदत केली नसती, तर देशाची अवस्था शेजारील राष्ट्रांसारखी झाली असती. यापूर्वीचे सरकार केवळ गरिबांच्या नावावर निवडून येत असे. उद्योगांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होते. मात्र, मोदी सरकारने प्रत्येक घटकाच्या मागणी आणि समस्या जाणून घेतल्या. भारताचा जीडीपी इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. महागाईचा दरही कमी आहे. देशात थेट परकीय गुंतवणूक येण्याचाही विक्रम झाला आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधींकडून भारताच्या अर्थव्यवस्थेचे गुणगान केले जात आहे. त्यामुळे आगामी २५ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात अव्वल असेल, असे मी नाही, तर जगभरातील अर्थतज्ज्ञ सांगत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बेळे यांनी प्रास्ताविकात, अपारंपरिक ऊर्जा, सोलर याबाबतच्या मागण्या मांडल्या. सोलर ट्रेड फ्री झोन हवे, सोलर उत्पादकांना कर्जात सवलती द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन सादर केले. या कार्यक्रमास निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर, लघु उद्योग भारती, महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post सौर ऊर्जा क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल : ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा appeared first on पुढारी.