स्टंटबाजी आली अंगलट! बिबट्यासोबत फोटोसेशन ‘सेल्फी बहाद्दराला’ पडले महागात

निफाड (जि.नाशिक) : येवला वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निफाड तालुक्यातील कुरुडगाव येथे ऊसतोडणी करणाऱ्या युवकाने उसाच्या फडात सापडलेल्या बछड्यासोबत सेल्फी काढली आणि चक्क स्वत:च्या मृत्यूलाच आमंत्रण दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण हाच स्टंट त्याच्याच अंगलट आला आहे. काय घडले नेमके?

ही स्टंटबाजी कि वेडेपणा?

गोदाकाठ परिसरातील कुरुडगाव शिवारात ऊस तोडणी चालु असताना बिबट्याचे बछडे आढळले. मात्र ऊस तोडणी कामगारांच्या पोरांनी या बछड्याला उचलून घेत यासोबत सेल्फी काढण्यासाठी आपले मोबाईल बाहेर काढून फोटोसेशन केले.  मात्र यावेळी परिसरात बिबट्याची मादी देखील होती. फोटोसेशन झाल्यानंतर या बिबट्याच्या बछड्यांना पुन्हा ऊस तोडणी कामगारांनी मादीकडे सोडून दिले. आता ही हिम्मत म्हणावी कि वेडेपणा हे तुम्हीच ठरवा...

बछड्यासोबत फोटो काढणे ऊसतोड कामगाराला पडले महागात 

तो सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला आहे. याबाबत माहिती अशी, की कुरुडगाव (ता. निफाड) येथे सोमवारी (ता. १) ऊसतोडणी करीत असताना चिंचखेडा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील ऊसतोड मजूर प्रकाश लक्ष्मण सोनवणे याला उसाच्या शेतात बछडा आढळून आला. त्यानंतर तरुणाने त्या बछड्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकारानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून संशयित आरोपी प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला निफाड न्यायालयात हजर केले असता, जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.  

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल