स्टील, सिमेंटच्या दरात पुन्हा दरवाढीने बिल्डर्स हैराण; घरांच्या किमतीवर होणार परिणाम 

नाशिक : पेट्रोल, डिझेल दरवाढीने सर्वसामान्य होरपळत असताना, दुसरीकडे स्टील व सिमेंटच्या दरवाढीने बांधकाम व्यावसायिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात घसरलेले दर या आठवड्यात पाच रुपयांनी वाढले, तर सिमेंटच्या दरात गोणी मागे ४० ते ४५ रुपये वाढ झाली. केंद्र सरकारच्या पातळीवरून स्टील, सिमेंट दरवाढीवर नियंत्रण नसल्याचा हा परिणाम असून, सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. 

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. सप्टेंबर महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू झाले. कोरोना महामारीत बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारी पातळीवरून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यात सर्वाधिक रोजगार मिळवून देणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी विशेष घोषणा करताना गरिबांसाठी घरे बांधण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. गृह कर्जात कपात, मोठ्या प्रकल्पांमध्ये छोट्या आकाराची घरे बांधण्यासाठी बिल्डर्सला प्रवृत्त करणे आदी योजनांचा समावेश होता. एकीकडे गरीबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देताना दुसरीकडे स्टील व सिमेंटच्या दरातील वाढ रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. घरे बांधण्यासाठी सिमेंट व स्टीलचा मोठा वापर होतो. बांधकामाच्या खर्चापैकी ७५ टक्के खर्च या दोनच बाबींवर अधिक होतो. त्यामुळे हा खर्च वाढला, तर घरांच्या किमती रोखणे अशक्य असते. मात्र, दोन्ही वस्तुंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्टीलच्या किमती प्रतिकिलो ४५ रुपयांपर्यंत होत्या. त्यानंतर पुन्हा पाच रुपयांनी वाढ झाली. आज दर ५४ ते ५५ रुपये प्रतिकिलो पोचले आहेत. सिमेंटच्या दरातही कमालीची वाढ झाली असून, गेल्या पंधरा १५ दिवसांत ४० ते ४५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कंपनी ब्रॅण्डनुसार ३००, ३२५ ते ३५० रुपयांपर्यंत आज प्रतिगोणी किंमत पोचली आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

स्टील, सिमेंटच्या वाढत्या किमतीमुळे परवडणारी घरे उपलब्ध होणे अशक्य आहे. वाढत्या दरासंदर्भात केंद्र सरकार व स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, किमती सातत्याने वाढत आहेत. 
-रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई  

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले