स्थगिती मिळाली अन् ग्रामपंचायतीच्या राजकारणात घडलं-बिघडलं; आता नवा डाव सुरु

येवला (नाशिक) : ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली, गावोगावी राजकीय जुगाड लागले, पॅनलनिर्मितीही झाली, जिल्ह्यातील १०२ पैकी पाच ते सहा ग्रामपंचायती व ५० वर जागा बिनविरोध होण्यावर अर्ज दाखल झाल्यानंतर शिक्कामोर्तबही झाले. मात्र कोरोनाने प्रक्रिया अगोदर स्थगित व आता रद्द करण्याची वेळ आणल्याने अनेक गावांच्या राजकारणात जुळलेलं गणित बिघडलं आहे. किंबहुना यापुढेही ‘नवा गडी-नवा राज’ या समीकरणाने नवीन जुळवाजुळव गावस्तरावर करावी लागणार आहे. 

बिनविरोध निवडीसह पॅनलनिर्मितीची समीकरणे बिघडली

गावाचं राजकारण मोठे बेरक असतं. नात्यागोत्याच्या राजकारणातही एकमेकांची असलेली खुन्नस अफलातूनच. त्यातूनच ग्रामपंचायतीचे राजकारण अधिक गटबाजीचे, भावकीचे आणि रंगेल होऊन जाते. या वर्षी जिल्ह्यात तब्बल ६२१ ग्रामपंचायतींची मुदत संपूनही कोरोनामुळे अद्याप निवडणूक होऊ शकलेली नाही. फेब्रुवारीत जाहीर झालेल्या १०२ निवडणुकांत अर्ज दाखलची प्रक्रियाही पूर्ण झाली असताना निवडणूक रद्द करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली आहे. याचा मोठा फटका गावोगावच्या पुढाऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी गावविकासाच्या सहमतीने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. येवल्यातील कोळगाव व कुसमाडी येथे जेवढ्या जागा तेवढेच अर्ज दाखल झाल्याने येथील निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा होती. इतर ग्रामपंचायतीच्यांही काही जागा बिनविरोध झाल्यात जमा होत्या. असेच चित्र जिल्हाभरातील अनेक ग्रामपंचायतीतही राहिल्याने सुमारे पाच ते सहा पूर्ण ग्रामपंचायती व पन्नासच्या आसपास विविध जागा बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. 

नवे समीकरणे पाहायला मिळतील हे नक्की 

अर्ज माघारीनंतरही काही ठिकाणी बिनविरोध मार्ग मोकळा झाला असता. मात्र तत्पूर्वीच निवडणूक आयोगाने १७ मार्चला येथील निवडणूक स्थगित केली आणि दोन दिवसांपूर्वी तर कार्यक्रम रद्द केल्याने आता सर्वच समीकरण बिघडले आहे. आता १०२ सह नंतरच्या ५१९ ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच वेळी होणार आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने जुळवाजुळव, पॅनलनिर्मिती आणि बिनविरोधसाठी फिल्डिंग लावण्याची वेळ गावपुढाऱ्यांवर येणार आहे. यापूर्वीचे जुळवलेले मोडल्याने पुन्हा जुळवाजुळव करण्याचे रस्ते खडतर झालेले बदललेले राजकारण पाहता दिसत आहे. त्यामुळे जानेवारी किंवा फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत सर्वत्र नवे समीकरणे पाहायला मिळतील हे नक्की! 

सर्व ग्रामपंचायतींसाठी नवीन मतदारयाद्या 

सलग दोन दिवसांत दोन आदेश काढून निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३३, तर जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार याद्याचा नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर २०२० ला अस्तित्वात असलेल्या याद्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी १ डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जातील. या याद्यांवर ७ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. तर १० डिसेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अशी आहे संख्या... 

जिल्ह्यातील एप्रिल ते जूनमध्ये कळवण २९, येवल्यातील २५, दिंडोरीतील ४४, इगतपुरीतील ४ अशा १०२ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. तर जुलै ते डिसेंबर या कालावधीत बागलाणमधील ४०, चांदवड ५३, देवळा ११, येवला ४४, नाशिक २५, नांदगाव ५९, मालेगाव ९९, इगतपुरी ४, दिंडोरी १६, त्र्यंबक ३, सिन्नर १००, निफाड ६५ अशा ५१९ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे.  

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?