स्थलांतरित मजुरांच्या हाताला मिळणार काम! सुधारित आदेशानंतर शेतीकामांना येणार गती

नाशिक : ‘ब्रेक द चेन’संदर्भातील सुधारित आदेशामुळे येत्या सोमवार (ता. १२) पासून कृषी निविष्ठा, पूर्वहंगामी कामे, पावसाळीपूर्व कामे यांसह शेतीपूरक व्यवसाय सुरू होणार असल्याने खरिपाच्या कामांना गती येणार आहे. खरिपाच्या कामाला गती येण्याने दसरा-दिवाळीपर्यंतचे अर्थचक्र गतिमान होणार आहे. 

‘ब्रेक द चेन’ उपक्रमात अर्थचक्र सुरू ठेवताना कोरोना निर्बंधाचा खरीप हंगामावर परिणाम होणार असल्याने त्यातून नव्या आदेशात शेतीकामासाठी सूट दिली आहे. त्यामुळे खरिपांच्या कामांना गती येणार आहे. जिल्ह्यात सुमारे २५ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होते. कृषिप्रधान जिल्ह्यात खरिपाच्या तयारीला सुरवात झाली आहे. कृषी निविष्ठांची विक्री, शेत तयार करण्यासह विविध शेतीकामांना सुरवात होणार आहे. लॉकडाउन आणि ‘ब्रेक द चेन’च्या निर्बंधामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील मजूर गावाकडे गेले आहेत. मात्र नव्या आदेशामुळे आता शेतमजुरांच्या हाताला काम मिळणार आहे. नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मजुरांना जिल्हाभरात मागणी असते. द्राक्षबागा, शेत तयार करण्यासह पेरणीपर्यंतच्या कामांसाठी मजुरांना मोठी मागणी आहे. ‘ब्रेक द चेन’ निर्बंधात बांधकाम क्षेत्रातील मजुरांना परवानगी होती. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळब

अर्थचक्राला गती 

खरिपाचा बाजारातील अर्थचक्राशी थेट संबंध आहे. शेतीतील मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे. बी-बियाणे, कृषी साहित्यांच्या विक्रीला गती येणार आहे. खरीप हंगामासाठी शेत तयार करण्यापासून तर त्यासाठी विळा, खुरपे, बी- बियाणे यापासून तर चांगल्या खरिपानंतर दसरा- दिवाळीपर्यंतच्या खरेदी-विक्रीतील उत्साहावर थेट संबंध येतो. खरीप चांगला झाला म्हणजे बाजारातील लहान- मोठ्या सगळ्याच आर्थिक उलाढालीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे खरीप चांगला होणे व त्यासाठी खरिपाच्या तयारीला अर्थचक्रात मोठे महत्त्व आहे. नव्या सुधारित आदेशात कृषी क्षेत्राशी संबंधित कामांना परवानगी दिल्याने खऱ्या अर्थाने उत्साह आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश