स्थलांतरित मतदारांसाठी पायघड्या! ‘व्होट बँक’ विखुरल्याने दिग्गजांची पंचाईत

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोरोना संसर्गाच्या प्रारंभी ज्यांना गावात प्रवेश करताना आडकाठी आणली गेली, त्यात शहरी भागातील मतदारांची मनधरणी आता सुरू झाली आहे. याद्या हातात पडताच आता स्थंलातरित मतदारांचा शोध घेत इच्छुक उमेदवार संपर्क साधत आहेत. नव्या वॉर्डरचनेत एकाच गल्लीतील मतदारांची नावे तीन वॉर्डात विभागणी झाल्याने एकगठ्ठा ‘व्होट बँक’ विखुरल्याने दिग्गजांची पंचाईत झाली आहे. निफाड तालुक्यातील ६५ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावगुंडीच्या राजकारणाला वेग आला आहे. 

‘व्होट बँक’ विखुरल्याने दिग्गजांची पंचाईत
निफाड तालुक्यातील काही नागरिक नोकरी, व्यवसायानिमीत्त मुंबई, नाशिक, पुणे शहरात स्थंलातरित झाले आहेत. प्रत्येक गावातील मतदार मोठ्या शहरात वास्तव्याला आहेत. या मतदारांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधत त्यांचे मत आपल्याच पारड्यात पाडण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. आपले स्टार प्रचार स्थलांतरित मतदारांकडे पाठवून त्यांच्या प्रवासाची सोय करण्याबरोबरच बडदास्त ठेवण्यापर्यंत आश्‍वासन दिले जात आहे. कोरोनाच्या काळात गावात प्रवेशबंदी करणारे आता शहरात स्थलांतरित मतदारांसाठी पायघड्या घालत आहेत. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

स्थलांतरित मतदारांसाठी पायघड्या
ग्रामपंचायत निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या इच्छुकांनी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासासाठी धावपळ सुरू केली आहे. काही गावांमध्ये वॉर्डरचना अस्ताव्यस्त झाली आहे. आक्षेप नोंदविण्याची मुदत संपल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. एकगठ्ठा व्होट बँक विखुरल्याने धाकधूक वाढली आहे. ‘टू बी ऑर नॉट बी’ असा प्रश्‍न सतावत आहे. आता लढायचंच...असा निर्धार करून काहींनी तयारी सुरू केली आहे. आरक्षित जागेवर लढण्यासाठी जातीचा दाखला काढण्याबरोबरच कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. ग्रामपंचायतीचे थकीत कर भरण्याचे औदार्य इच्छुक दाखवत आहेत. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

नात्यांमध्येच लढतीची शक्यता 
६५ गावांमध्ये इच्छुकांनी बैठका घेण्यास सुरवात केली आहे. भाऊबंदकीत लढती रंगण्याची चिन्हे आहेत. बांधावरच्या भाऊबंदकीला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेषत: सर्वसाधारण किंवा ओबीसींच्या जागेवर सख्खे काका, पुतणे, भाऊ, भावजयी इच्छुक असल्याने लढतीला वेगळ्याच रंग असणार आहे. थंडीचा जोर वाढत असताना राजकारणाने मात्र वातावरण तापले आहे. 

युवा नेतृत्वाभोवती निवडणूक 
निफाड तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका युवा नेतृत्वाभोवती फिरण्याची चिन्हे आहेत. ग्रामपंचायतीत दम नाही म्हणून ज्येष्ठ थांबतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये हा संघर्ष होत आहे. ग्रामपंचायतीत एकूण सदस्यसंख्या व निवडणूक लढविण्यास इच्छुकांची मांदियाळी पाहता इतर इच्छुकांनी मनधरणी करायला गेले, तर आमचं बी नाव पंचायतीच्या बोर्डावर लागू द्या, असे प्रतिउत्तर ऐकायला मिळत आहे