‘स्थायी’तील भाजपच्या सत्तेला सुरूंग लागण्याची शक्यता; मनसेची भूमिका ठरणार आता महत्त्वाची

नाशिक : महापालिका सभागृहात भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ घटल्याने तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेचा एक अतिरिक्त सदस्य स्थायी समितीत नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी (ता. २८) उच्च न्यायालयाने दिला. यामुळे भाजपचे आठ, तर विरोधकांचे आठ सदस्य आता नियुक्त करावे लागणार असल्याने स्थायी समितीमधील भाजपच्या सत्तेला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. 

तौलनिक संख्याबळानुसारच सदस्यांची नियुक्ती
नगरसेविका शांता हिरे यांचे निधन व नाशिक रोड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेत भाजपचे संख्याबळ ६६ वरून ६४ पर्यंत घटले. त्याआधारे तौलनिक संख्याबळ ८.३९ झाले आहे, तर शिवसेनेचे ३५ सदस्य असल्याने तौलनिक संख्याबळ ४.५९ आहे. तौलनिक संख्याबळ वाढल्याने शिवसेनेने स्थायी समितीवर अतिरिक्त सदस्याच्या नियुक्तीची केलेली मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी धुडकावून लावल्याने त्या विरोधात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यावर गुरुवारी निकाल देताना तौलनिक संख्याबळ ग्राह्य धरले. त्यामुळे पुढील महिन्यात निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये शिवसेनेच्या तीन सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

समितीत शिवसेनेचा एक अतिरिक्त सदस्य 

स्थायी समितीत शिवसेनेचे संख्याबळ पाच होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य राहणार आहे. विरोधकांची मोट बांधल्यास आठ, तर भाजपचे आठ सदस्य होऊन समसमान बलाबल होईल. त्यातून एक तर चिठ्ठी पद्धतीने नियुक्ती होईल किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेपैकी एका सदस्याने भाजपला साथ दिल्यास भाजपची सत्ता वाचण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत मनसे भाजपच्या बाजूने जाण्याचीच दाट शक्यता आहे. दाखल दोन याचिकांपैकी एका याचिकेत तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेचा एक सदस्य वाढत असल्याचा दावा करण्यात आला होता. तर दुसऱ्या याचिकेत भाजपचा अतिरिक्त एक सदस्य वगळण्याची मागणी करण्यात आली होती. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

विद्यमान समितीला धोका नाही 
विद्यमान स्थायी समितीची मुदत २८ फेब्रुवारीला संपुष्टात येत असतानाच न्यायालयाने दाखल याचिकेवर निकाल दिला असला, तरी विद्यमान समितीला धोका नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सभापती गणेश गिते यांच्यासह भाजपचे कमलेश बोडके, शरद मोरे, रूपाली निकुळे, स्वाती भामरे, शिवसेनेच्या कल्पना पांडे, सुनीता कोठुळे व मनसेचे अशोक मुर्तडक यांच्या जागेवर नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. भाजपच्या पाचपैकी चार जागांवर नियुक्ती केली जाईल. 

न्यायालयात सत्याचाच विजय झाला आहे. निकालाने महापौरांच्या हेकेखोरपणाला चाप मिळाला आहे. आता तरी महापौरांनी पदाचा अतिरेक न करता तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेचा अतिरिक्त एक सदस्या नियुक्त करावा. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते 
 

 

निकालाची प्रत अद्याप हाती पडलेली नाही. निकालात काय म्हटले, याचा अभ्यास करून गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ. - जगदीश पाटील, गटनेते, भाजप