स्थायीवरील शिवसेनेच्या नियुक्त्या बेकायदेशीर! भाजपचा सेनेवर पलटवार

नाशिक : स्थायी समितीवर सदस्यांची नियुक्ती करताना बंद लिफाफ्यात नावे देणे बंधनकारक असताना शिवसेना गटनेत्यांनी बंद लिफाफ्यात नावे न दिल्याने सदस्यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे गटनेते जगदीश पाटील यांनी शासनाकडे लेखी तक्रार केल्याने स्थायी सदस्य नियुक्तीवरून तांत्रिक मुद्यांचा आधार घेऊन राजकारण चांगलेच रंगात आले आहे. त्याव्यतिरिक्त शिवसेना भाजपच्या चार सदस्यांच्या नियुक्ती बेकायदेशीर ठरवत असेल, तर न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी नियुक्त करण्यात आलेले सर्वच सदस्य बाद ठरविण्याची चाल खेळण्याच्या तयारीत भाजप आहे. 

गेल्या वर्षी स्थायी समिती सदस्य नियुक्तीचा वाद न्यायालयात पोचल्यानंतर त्यावर निकाल देताना न्यायालयाने शिवसेनेचा एक अतिरिक्त सदस्य नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (ता. २४) स्थायी समिती सदस्यांची घोषणा झाली. भाजपने सर्व म्हणजे आठही सदस्यांची नव्याने नियुक्ती करताना शिवसेनेचे यापूर्वीच दोन व नव्याने तीन सदस्यांची नियुक्ती केली. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी महापौरांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप करताना तक्रार केल्यानंतर भाजपकडून जशास तसे उत्तर देण्याची चाल खेळताना तांत्रिक मुद्यांचा आधार घेण्यात आला आहे. भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी आयुक्तांसह शासनाकडे तक्रार करताना शिवसेनेवर पलटवार केला. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

शिवसेनेचे सदस्यत्व रद्द करावे 

विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करताना शिवसेनेचे विरोधी पक्षनेते व गटनेत्यांकडून शासन निर्देशांचे पालन झाले नाही. तौलनिक संख्याबळाच्या आधारे नियुक्तीसाठी नावे पाठविताना बंद लखोट्यात सभेच्या वेळी महापौरांकडे दिली जातात. मात्र, २४ फेब्रुवारीला झालेल्या महासभेत बंद लखोट्यात नावे दिली न गेल्याने बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे शिवसेना गटनेत्यांकडून सुचविलेल्या सदस्यांची स्थायी समितीवरील नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे बंद लखोट्यातील एक प्रत महापालिका आयुक्तांनाही दिली जाते. त्या सूचनेचेही पालन शिवसेनेकडून झाले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

बडगुजर, गाडेकरांची कोंडी 

शिवसेनेकडून तांत्रिक मुद्यांवर भाजपची कोंडी केली जात असल्याने भाजपकडूनही तांत्रिक मुद्यांचा आधार घेत स्थायी समिती सदस्यांचे सदस्यत्वच रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी १९६ क्रमांकाच्या ठरावानुसार सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. उच्च न्यायालयाने ठराव रद्द करण्याच्या सूचना दिल्याने त्याचा आधार घेत शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार आहे.