स्थायीसाठी महाविकास आघाडीची रणनीती; फॉर्म्युला कायम राहणार

नाशिक : स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ एकने घटल्याने सत्ताधारी व विरोधकांचे समसमान बल होणार असल्याने शेवटच्या वर्षात भाजपकडून स्थायी समितीची सत्ता हस्तगत करण्याची संधी निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी (ता. ९) बैठक होणार आहे. स्थायी समितीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाल्यास महापालिका निवडणुकीतही तोच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांची आज बैठक 
स्थायी समितीत भाजपचे नऊ, शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. मात्र, भाजपचे महासभेतील संख्याबळ दोनने घटल्याने सदस्यसंख्या ६४ पर्यंत आली आहे. त्यामुळे तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेचा एक सदस्य वाढणार आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने तौलनिक संख्याबळानुसार सदस्य निवडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २८ फेब्रुवारीच्या आत शिवसेनेचे पाच सदस्य स्थायी समितीसाठी नियुक्त केले जातील. सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे आठ व विरोधकांचे आठ सदस्य राहणार आहेत. त्या अनुषंगाने स्थायी समिती काबीज करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

विषय समित्यांवर शिवसेनेचा दावा 
स्थायी समितीवर तौलनिक संख्याबळाच्या आधारे एक अतिरिक्त सदस्य नियुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्याच आधारे विषय समित्यांवरही शिवसेनेचा अतिरिक्त एक सदस्य नियुक्तीची मागणी करताना समित्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी शिवसेना करणार आहे. शिक्षण, महिला व बालकल्याण, शहर सुधार, वैद्यकीय, विधी या समित्यांवर शिवसेना दावा ठोकणार असल्याने भाजपच्या गटात खळबळ उडाली आहे.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच