स्थायी सभापतीपदी गणेश गितेंचा मार्ग मोकळा; सलग दुसऱ्या वर्षी बिनविरोध नियुक्ती होणार 

नाशिक : स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या नियुक्तीची आता फक्त औपचारिकता राहीली असून, सलग दोन वर्षे सभापती होणारे ते तिसरे नगरसेवक ठरले आहे. मनसेचा पाठिंबा व शिवसेनेने परिस्थिती बघून तटस्थ राहण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला सत्ता राखण्यात यश आले. 

महापालिका सभागृहात भाजपचे दोन सदस्य कमी झाल्याने तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये संख्याबळ घटले. १६ सदस्यांच्या सभागृहात भाजपचे आठ, शिवसेनेचे पाच, कॉंग्रेस, मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक असे सदस्य आहेत. भाजप व विरोधकांचे प्रत्येकी आठ सदस्य झाल्याने शेवटच्या पंचवार्षिकमधील भाजपची सत्ता जाण्याचा धोका निर्माण झाला होता. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी बहुमत असूनही सत्ता राखताना नाकीनऊ आले होते. स्थायी समितीमध्ये देखील तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्वार्थाने ताकदवान असलेल्या गणेश गिते यांना पुन्हा सभापती बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी सदस्यांची नियुक्ती झाली. त्याच दिवशी पहाटे ८ सदस्यांना सुरक्षित स्थळी मुक्कामाला हलविण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर बोलणी करून मनसेचा एक सदस्य भाजपच्या तंबूत दाखल झाल्याने भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतरही भाजपने सुरक्षिततेची काळजी घेत अन्य पक्षांचे सदस्य गळाला लावल्याची चर्चा होती. शिवसेनेने भाजपची स्थायीतील सत्ता उलथविण्यासाठी मोर्चेबांधणी केली, मात्र सत्ता उलथविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ हाती नसल्याची जाणीव झाल्यानंतर तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर करण्यात आली. ९ मार्चला सभापती पदासाठी ११ अकरा वाजता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी आज (ता.८) उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत एकमेव गिते यांनी चार अर्ज दाखल केले. विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या सभापती पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

सलग दुसऱ्यांदा सभापती 

१९९२-९२ व १९९३-९४ असे सलग दोन वर्षे कॉग्रेसचे उत्तमराव कांबळे सभापती झाले होते. त्यानंतर १९९६-९७ व १९९७-९८ मध्ये विजय बळवंत पाटील व आता २०२०-२१ मध्ये भाजपचे गणेश गिते सभापती होते. आता २०२१-२२ या कालावधीसाठी सभापती होणार आहे. त्या व्यतिरिक्त कॉग्रेसचे शाहु खैरे दोनदा सभापती झाले, परंतु स्वतंत्र कालावधी होते. उद्धव निमसे एकदा कॉंग्रसेकडून तर दुसऱ्यांदा भाजपकडून सभापती झाले. 

स्थायी समितीत मातब्बर 

यंदाच्या स्थायी समितीमध्ये सलग दोन वर्षे सभापती राहणारे गणेश गिते यांच्यासह माजी महापौर रंजना भानसी, माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके व माजी विरोधी पक्षनेते शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व यापूर्वी स्थायी समिती सदस्य राहिलेले मुकेश शहाणे व प्रतिभा पवार अशी मातब्बर सदस्य असल्याने खऱ्या अर्थाने स्थायी समिती स्ट्रॉंग मानली जात आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर