स्थायी समितीत भाजपचे नवे आठ चेहरे! फाटाफूट न होण्याची काळजी

नाशिक : उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार भाजपचा एक सदस्य कमी करताना पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून कायदेशीर सल्ल्यानुसार भाजपने स्थायी समितीवर सर्वच आठ सदस्यांची नियुक्ती करताना शिवसेना, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवाद काँग्रेस या सर्वच पक्षांच्या सदस्यांची नव्याने घोषणा केली.

फाटाफूट होऊ नये, याची काळजी

माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके या जुन्या जाणत्यांचा समितीत समावेश करताना मुकेश शहाणे यांना सामावून घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात असले तरी फाटाफूट होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. 

सोळा सदस्यांची नव्याने नावे घोषित
स्थायी समिती सदस्यांच्या निवृत्त आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी ऑनलाइन सभा बोलाविली होती. गेल्या वर्षी तौलनिक संख्याबळानुसार नियुक्ती न झाल्याने शिवसेनेने न्यायालयातून आक्षेप घेतला होता. न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निकाल देताना भाजपचा एक सदस्य कमी करून त्याऐवजी शिवसेनेचा एक सदस्य वाढविण्याचा निकाल दिला होता. त्यानुसार बुधवारी (ता. २४) महापौरांनी स्थायी समिती सदस्यांची नावे घोषित केली. त्यापूर्वी भविष्यात पुन्हा अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आल्यानंतर सर्वंच सोळा सदस्यांची नव्याने नावे घोषित करण्यात आली.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

नाराजीचा सूर व्यक्त

माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, विद्यमान सभापती गणेश गिते यांना पुन्हा संधी देण्यात आली, तर मुकेश शहाणे पहिल्या वर्षी सदस्य असताना त्यांना शेवटच्या वर्षात पुन्हा स्थायी समिती देण्यात आल्याने भाजपमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकीचे शेवटचे वर्ष असल्याने त्यात स्थायी समितीत समसमान पक्षीय बलाबल झाल्याने दगाफटका होऊ नये म्हणून नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात असले तरी इतरांवर अविश्‍वास दाखविण्यात आल्याचा नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक झाल्यानंतर काही सदस्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्या जागेवर इतरांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात असून, त्यात नाशिक रोडचे अंबादास पगारे यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

...असे आहेत स्थायीचे नवीन सदस्य 
भाजप- रंजना भानसी, हिमगौरी आहेर-आडके, गणेश गिते, मुकशे शहाणे, माधुरी बोलकर, प्रतिभा पवार, योगेश हिरे, इंदुमती नागरे. 
शिवसेना- सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, रत्नमाला राणे, केशव पोरजे. 
इतर सदस्य- सलीम शेख (मनसे), समिना मेमन (राष्ट्रवादी काँग्रेस), राहुल दिवे (काँग्रेस).