स्थायी समिती निवडणुकीचा भाजपचा मार्ग मोकळा! शिवसेनेने गुंडाळला कॅम्प; घोडेबाजार टळणार 

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पुरेसे सदस्य संख्याबळ होत नसल्याने व यातून मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या एक सदस्य असलेल्या पक्षांचे महत्त्व वाढून आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता निर्माण झाल्याने अखेरीस शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पंचवार्षिकमधील शेवटच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (ता. ९) होणार आहे. भाजपचे आठ सदस्य आहेत. शिवसेनेचे पाच, काँग्रेस, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक असे आठ सदस्य असल्याने भाजपच्या हातून सत्ता खेचून घेण्याची रणनीती शिवसेनेने आखली होती. मात्र, भाजपची खेळी शिवसेनेला भारी पडली. भाजपने त्यांचे आठ सदस्य अहमदाबादला रवाना केले, तर मनसेचा आणखी एक सदस्य गळाला लावल्याने नऊ सदस्यांच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र, शिवसेनेने भाजपला महापौर निवडणुकीप्रमाणे कोंडीत पकडण्याची रणनीती आखली. मनसेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सोबत येतील, असे गृहीत धरून शिवसेनेच्या पाच सदस्यांना इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित स्थळी हलविले. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यही भाजपच्या गोटात सहभागी झाल्याचे समजल्यानंतर शिवसेनेचा धीर खचला. त्यात कामाचे निमित्त करून शिवसेनेचा एक-एक सदस्य सहल स्थळावरून बाहेर पडू लागला. शिवसेनेने निवडणूक लढविल्यास अन्य पक्षांचे महत्त्व वाढून त्यातून घोडेबाजार होईल, असा निष्कर्ष काढत शिवसेनेने सभापतिपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. यामुळे भाजपच्या सभापतिपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याला शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दुजोरा दिला. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

मनसेचे महत्त्व कमी होणार 
शिवसेनेने निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर एक सदस्य असलेल्या मनसेला अचानक महत्त्व आले होते. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी ही चाल खेळली. आता शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने मनसेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी होणार आहे. 

शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्याशिवाय निवडणूक लढल्यास ज्या पक्षांचे एक सदस्य आहे त्या सदस्यांना विनाकारण महत्त्व येऊन घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही सक्षम विरोधी पक्ष म्हणून शिवसेना भूमिका बजावेल व चुकीच्या कामांना आळा घालेल. 
-भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना  

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा