स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती : मनसे भाजपच्या गळाला, सभापतिपदासाठी खेळी  

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती बुधवारी (ता. २४) ऑनलाइन महासभेत होणार आहे. भाजपचे चार, शिवसेनेचे तीन तर मनसेचा एक, असे एकूण आठ सदस्यांची नियुक्ती होणार असली, तरी भाजपकडून आठ नवीन सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे आठ व विरोधकांचे आठ, असे समसमान सदस्य बळ होणार असले तरी मनसेला आधीच गळाला लावल्याने भाजपचा सभापती होणार असल्याचे तूर्त दिसून येत आहे. 

स्थायी समिती सदस्यांची आज नियुक्ती 
भाजपच्या सदस्यांची संख्या दोनने कमी झाल्याने तौलनिक संख्याबळही घटले आहे. गेल्या वर्षी शिवसेनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने भाजपचा एक सदस्य कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेनेचा एक सदस्य वाढणार आहे. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आठ सदस्य निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्ती होणार आहे. पाच जागांसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या समर्थक माधुरी बोलकर, भगवान दोंदे, डॉ. दीपाली कुलकर्णी, इंदूबाई नागरे, चंद्रकांत खोडे, अंबादास पगारे, अनिल ताजनपुरे व विद्यमान सभापती गणेश गिते यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

मनसे भाजपच्या गळाला; सभापतिपदासाठी खेळी 

याव्यतिरिक्त दिनकर आढाव, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे यांची नावेही चर्चेत आहेत. महापौर निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन भाजपकडून खबरदारी घेतली जाणार आहे. ज्या सदस्यांची नियुक्ती होईल त्यांना तत्काळ शहराबाहेर नेले जाणार आहे. याव्यतिरिक्त सभापतिपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, गटनेते जगदीश पाटील, प्रा. शरद मोरे यांची नियुक्ती करून निवडणुकीनंतर तत्काळ त्यांचे राजीनामे घेऊन सभापतिपदाची निवडणूक निर्विघ्न पार पाडण्याची चाल खेळली जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

मनसेकडून शेख, सेनेत स्पर्धा 
स्थायी समितीचे माजी सभापती सलीम शेख यांचे नाव मनसेकडून देण्यात आले आहे. समसमान बलाबल झाल्याने भाजपला मनसेची गरज लागणार आहे. मनसेकडूनही शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपला मदत केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेकडून ऐनवेळी योगेश शेवरे यांचा पत्ता कट करण्यात आला, तर ॲड. वैशाली भोसले यांना पुन्हा स्थायी समिती सदस्यत्व नाकारण्यात आल्याने मनसेला निवडणुकीच्या तोंडावर नाराजीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विद्यमान स्थायी समितीवर सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर यांचे सदस्यत्व कायम ठेवून त्याव्यतिरिक्त तीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात ज्योती खोले, पूनम मोगरे, केशव पोरजे, सुवर्णा मटाले किंवा संतोष गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.  

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले