Site icon

स्पर्धा, संघर्षातून गुन्हा

एक शून्य शून्य : गौरव अहिरे

आपल्याच गॅंगची दहशत पाहिजे, या हेतूने गुन्हेगार प्रतिस्पर्धी गँगच्या सदस्यांवर जीवघेणे हल्ले करून वर्चस्व प्रस्थापित करत असतात. त्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल होऊन नवनवीन गुन्हेगारही समोर येतात. मात्र, गेल्या काही दिवसांत शहरातील गुन्ह्यांवरून सराईत गुन्हेगारांसोबतच सामान्य नागरिकही जगण्याच्या स्पर्धेत किंवा संघर्षात टिकण्यासाठी गुन्हे करत असल्याचे दिसत आहे. नाशिकरोड येथील सोनवणे हत्याकांड हेदेखील त्याचेच उदाहरण! याच प्रकारे कमी कालावधीत पैसे कमवण्याच्या नादात तरुणाईदेखील कळत-नकळत गुन्हे करत असल्याने, हे प्रकार टाळण्यासाठी समुपदेशनासोबतच निकोप स्पर्धावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्रत्येक सजीव जन्मापासूनच संघर्षास सुरुवात करत असतो आणि हा संघर्ष मृत्यूपर्यंत कायम असतो. या संघर्षाला स्पर्धेचीही जोड असते. संघर्ष आणि स्पर्धेतील यश-अपयश हेच आपले जीवन असते. कधी कधी संघर्ष, स्पर्धांमुळे माणसाच्या आयुष्यात दु:ख निर्माण होऊन तो स्वत:ला असुरक्षित समजतो. त्यातून तो स्पर्धेतून माघार घेतो किंवा चुकीच्या मार्गाने स्पर्धा जिंकण्याची मानसिक तयारी करतो. त्यामुळे चुकीच्या निर्णयांमुळे कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यास सुरुवात होते. नाशिकरोड येथील फर्निचर व्यावसायिक शिरीष सोनवणे यांचा अज्ञात व्यक्तींनी खून केला. या खुनाचे कारण हे पोलिसांनी तपास करून समोर आणले आणि मारेकरीही शोधले. मारेकरी हे सोनवणे यांचे प्रतिस्पर्धी होते. सोनवणे यांच्यामुळे आपल्याला व्यवसाय मिळत नसल्याचा आरोप करत दोन्ही प्रतिस्पर्धी व्यावसायिकांनी हा चुकीचा मार्ग निवडला. व्यवसाय होत नसल्याने ते दोघेही आर्थिक विवंचनेत फसलेले असताना, त्यांनी सोनवणे यांच्याकडून जबरदस्तीने व्यवसाय वळवण्याचा प्रयत्न केला. सोनवणे यांनी विरोध केल्याने दोघांनी त्यांचा खून केला. त्यामुळे दोन्ही व्यावसायिकांच्या चुकीच्या निर्णयामुळे ते गुन्हेगार झालेत. व्यावसायिक स्पर्धेत त्यांना टिकता न आल्याने किंवा संघर्ष न करता कमी कालावधीत त्यांनी यश मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडल्याने गंभीर गुन्हा करण्याचीही हिंमत दोघांनी केली. मात्र, ते फसले आणि त्यांचे भविष्यही अनिश्चिततेच्या लाटेवर जाण्याची शक्यता आहे.

अशाचप्रकारे शिक्षण घेऊनही बेरोजगार असल्याने सासुरवाडीतच‌ घरफोडी करून २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरणारा जावई असो की, मौजमजा करण्यासाठी प्रेयसीसोबत मिळून दुचाकी चोरणारा प्रियकर असो. तर जबरी चोरी करून बँकेत सुमारे २० लाख रुपयांची मुदत ठेव करणारा चोरटा, चोरी-घरफोडी करून अल्पावधीत तीन मजली घर बांधणारा चोरटा अशी अनेक उदाहरणे आहेत. कष्टाऐवजी गैरमार्ग निवडून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकले जात असल्याचे हे च‌ित्र विदारक आहे. मात्र, ज्या वेगाने चुकीच्या मार्गाने प्रगती केली, त्याच वेगाने ते पोलिसांच्याही जाळ्यात आले व गुन्हेगारी कृत्यांना पूर्णविराम देण्याची त्यांना वेळ आली. या घटनांमुळे सराईत गुन्हेगारांसोबतच पोलिसांना सर्वसामान्यांमधील गुन्हेगारी मानसिकता व वृत्ती असलेल्यांचाही शोध घ्यावा लागत आहे. ही मानसिकता किंवा वृत्ती नष्ट करण्यासाठी सकारात्मक स्पर्धावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, संघर्ष हा आपले अस्तित्व मिटवण्यासाठी नव्हे, तर अस्तित्व टिकवून ते वाढवण्यासाठी असतो, हे प्रत्येकाच्या मनावर बिंबवणे गरजेचे झाले आहे. असे झाल्यास गुन्ह्यांमध्ये घट होऊन कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्यही सुदृढ होण्यास मदत होईल. त्यातून कुटुंब, गाव, शहर, राज्य, देशाचा विकास सहज शक्य होईल.

हेही वाचा:

The post स्पर्धा, संघर्षातून गुन्हा appeared first on पुढारी.

Exit mobile version