स्मार्टसिटीच्या वाहन पार्किंगसाठी नाही देणार छत्रपती स्टेडियमची जागा – बाळासाहेब क्षीरसागर

नाशिक :  स्मार्टसिटी कंपनीच्या पार्किंगच्या विरोधात जिल्हा परिषदेने दंड थोपटले आहे. कोणत्याही परिस्थितीत वाहन पार्किंगसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची जागा देणार नाही, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी बुधवारी (ता. २) येथे ठणकावले. वाहन पार्किंगसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, असा सल्लाही त्यांनी कंपनीला दिला. 

 क्षीरसागर म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या मालकीची श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची जागा ही जिल्हा परिषदेच्या स्टेडियम समितीच्या ताब्यात आहे. हे क्रीडांगण विकसित करण्यासाठी तथा अद्ययावत क्रीडांगण बांधकामासाठी अटी व शर्थीस अधिन राहून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० वर्षांसाठी कराराने हस्तांतरित करण्यात आले आहे. नाशिक शहर स्मार्टसिटी योजेनेंतर्गत वाहनतळासाठी नाशिक महापालिकेने यापूर्वीही मागणी केली होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची जागा ही क्रीडा प्रकारांसाठी आरक्षित असून, न्यायालयाचे आदेश आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या स्टेडियम समितीने दोनवेळा ठराव करून ही जागा देण्यास स्पष्ट नकार स्मार्टसिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविला आहे. 

स्मार्टसिटी पार्किंग प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेच्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोचल्याने जिल्हा परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. श्री. क्षीरसागर म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या मालकीची श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची जागा ही नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ग्रामीण-शहरी खेळाडूंना सराव करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत स्मार्टसिटीसाठी स्टेडियमची जागा दिली जाणार नाही. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

नाशिककर रस्त्यावर... 

श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम ही बाब नाशिककरांच्या अस्मितेचा मुद्दा आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा हा विषय आला तेव्हा तेव्हा याची चुणूक दिसली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी स्टेडियम वाचवण्यासाठी फिके पडल्यास नाशिककर रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

स्टेडियम ‘गले की हड्डी’ 

जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मोक्याच्या जागेसाठी नाशिककरांनी न्यायालयीन लढा दिला आहे. त्यातूनही पूर्वीच्या काही लोकप्रतिनिधींनी अतिहव्यासापोटी इथल्या जागा घश्‍यात घातल्या. त्यापैकी काही जागा जिल्हा परिषदेच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी परत मिळविल्या आहेत. स्टेडियमच्या जागेवरून जिल्हा परिषदेच्या सभा कायदेशीर बाबींवर गाजल्या आहेत. क्रीडाप्रेमी व संघटना घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. खेळाडू दुर्लक्षित होतील, अशी कृती यंत्रणेसाठी स्टेडियम ‘गले की हड्डी’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदेशीर बाबी हे त्यामागील प्रमुख कारण आहे.  

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच