स्मार्टसिटीत सिलिंडरसाठी टप्प्याटप्प्याने ओटीपी; ग्रामीणसाठी विचारविनियम सुरू 

नाशिक : घरगुती गॅस सिलिंडर प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी वितरण प्रमाणीकरण कोड प्रणाली देशातील १०० स्मार्ट शहरांमध्ये १ नोव्हेंबरपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यांतर्गत सिलिंडर घेताना ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्याचा वापर मात्र या शहरांमधील सर्वच भागात करण्यात आलेला नाही. सर्व्हरच्या अडचणींमुळे ओटीपी ग्राहकांपर्यंत पोचत नसल्याची समस्या पुढे आली असून, प्रणालीचे अद्ययावतीकरण केले जात आहे. ही प्रणाली स्मार्ट शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. 

काळा बाजार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

ओटीपी प्रणालीतील त्रुटी दूर झाल्यानंतर त्याचा सर्वत्र वापर होण्याची शक्यता अधिक आहे. व्यावसायिक सिलिंडरचा त्यात समावेश होईल. शिवाय तेल कंपन्या आणि पेट्रोलियम कंपन्यांमध्ये ग्रामीण भागासाठी ओटीपीऐवजी ‘लॅटिट्यूड-लॉँजिट्यूड’चा वापर करता येईल काय, या अनुषंगाने विचारविनिमय सुरू असल्याची बाब तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादातून पुढे आली आहे. गॅस सिलिंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. गॅस सिलिंडरची नोंदणी केल्यावर कंपनीकडे नोंदणी असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठविला जातो. हा ओटीपी घरगुती गॅस सिलिंडर घेताना सांगितल्यावर सिलिंडर मिळते. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

गॅस एजन्सींना दिली जातेय माहिती 

दिवाळीच्या अगोदर ८० ते ९० टक्के ग्राहकांना ओटीपी मिळत होते. पण दिवाळीनंतर ग्राहकांना ओटीपी मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्याचे गॅस एजन्सींकडून सांगण्यात आले. मग त्यावर उपाय काय, अशी विचारणा केल्यावर बुकिंगच्या आधारे गॅस सिलिंडर दिले जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ओटीपी प्रणालीमध्ये येत असलेल्या अडचणींचे निराकरण केले जात आहे. कंपन्यांकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलखेरीज ग्राहकांकडे असलेल्या दुसऱ्या मोबाईलवरही ओटीपी कसा जाऊ शकेल यासंबंधाने तांत्रिकदृष्ट्या कंपन्यांकडून ‘अपडेशन’ सुरू आहे. ‘डिलिव्हरी डन’ कशी करायची याची माहिती गॅस एजन्सींना देण्यास सुरवात केली आहे. डिजिटल, पेटीएमद्वारे वितरण कसे करायचे याचीही माहिती कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींना दिली आहे. ओटीपी प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागेल अशी चर्चा सुरू आहे. त्याचअनुषंगाने तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणासाठी नेमका किती दिवसांचा कालावधी लागेल, याची विचारणा तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडे केल्यावर त्यासाठी नेमका किती कालावधी लागेल हे आता सांगणे शक्य नसल्याची माहिती मिळाली. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

थंडीत गॅसचा २० टक्क्यांनी खप वाढला 

थंडीमुळे घरगुती गॅसचा खप २० टक्क्यांनी वाढला आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांची नाशिक शहर-जिल्ह्यामध्ये दिवसाला ३० हजार सिलिंडरची विक्री होत आहे. शहरामधील एजन्सींना पुरवठा केला जात असला, तरीही त्यातून ग्रामीण भागात सिलिंडर पोचविली जात आहेत. एका वर्षामध्ये पहिल्या सहा महिन्यांत सर्वसाधारणपणे ४० टक्के सिलिंडरची मागणी राहते. पुढील सहा महिन्यांत ६० टक्के सिलिंडर कुटुंबांकडून विकत घेतला जातो, असा तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा अनुभव आहे.