स्मार्टसिटी कंपनीची वार्षिक सभा गाजणार; मुदतवाढीची रणनीती 

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीची स्थापना झाल्यापासून व मुदत संपूनही मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या प्रकाश थविल यांना स्मार्टसिटी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यमुक्त केले जाणार आहे. दरम्यान २४ डिसेंबरला स्मार्टसिटी कंपनीच्या संचालकांची बैठक होणार असून, त्यात थविल यांच्या रिटायर बाय रोटेशन पद्धतीने मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे, तर दुसरीकडे कंपनीच्या लोक नियुक्त सर्वपक्षीय संचालकांनी थविल यांना हटविण्यासाठी मोट बांधली आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीची वार्षिक सभा गाजण्याची चिन्हे आहेत. 

संचालकांची मुख्याधिकाऱ्यांविरोधात, तर मुख्याधिकारी मुदतवाढीची रणनीती 
स्मार्ट रस्त्यावर २१ कोटी रुपये खर्च करूनही गुणवत्तापूर्ण काम न होणे, स्मार्ट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला परस्पर ९० लाख रुपये दंडमाफी, स्मार्ट प्रकल्पांची संथ गती व प्रकल्पांची वाढलेली किंमत यावरून स्मार्टसिटी कंपनी व कंपनीचा कारभार सांभाळणारे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या कामकाजासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी स्मार्टसिटी कंपनीच्या कामांमधील संथपणा व अनियमिततेचा लेखाजोखा यापूर्वी मांडला होता. कमांड कंट्रोल सेंटर, गावठाणातील कामे, रस्ते व सायकल शेअरिंग प्रकल्पांची वाताहत, प्रोजेक्ट गोदा प्रकल्प, स्मार्ट पार्किंग, एलईडी फिटिंग, सोलर पॅनल, कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांची संथगतीने सुरू असलेल्या कामांचा पर्दाफाश करताना प्रकल्पांच्या दुरवस्थेला थविल हेच जबाबदार असल्याचा दावा केला होता. या संदर्भात कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांना तक्रारींची शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, तक्रारींच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. १०) समन्वय समितीची बैठक होणार आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

महापौर आक्रमक 
स्मार्टसिटी कंपनीसाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे; परंतु त्यांपैकी फक्त १२० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ५२ प्रकल्पांपैकी अवघे २२ प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी संचालकांच्या बैठकीत थविल यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ऑगस्टमध्ये बदली होऊनही थविल यांनी पदभार सोडत नसल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही तक्रार केली होती. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मुदतवाढीला संचालकांचा विरोध आहे. त्यांच्यामुळेच प्रकल्पांचे काम संथगतीने सुरू आहे. त्यांना मुदतवाढ देता येणार नाही. -अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, महापालिका