Site icon

स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात माजी नगरसेविकेचे उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या प्रभाग 12 मध्ये स्मार्ट सिटी कंपनीने स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्त्यांची खोदकामे सुरू केली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या या बेजबाबदार कामांविरोधात काँग्रेसच्या प्रवक्त्या तथा माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी उपोषण सुरू केले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीने टिळकवाडी तसेच इतर परिसरांत सुरू केलेल्या कामांमुळे नाशिक महापालिका आणि स्मार्ट कंपनीत समन्वय नसल्याची बाब पुन्हा समोर आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. प्रभाग क्र. १२ मधील टिळकवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. रस्त्याच्या कडेला पेव्हरब्लॉक टाकल्यानंतर याच रस्त्यांवर आठ दिवसांत जलवाहिनीचे काम हाती घेतले गेले. अनंत कान्हेरे मैदानाकडून मनपा मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने गॅसवाहिनीसाठी खोदकाम केले होते. या रस्त्याची डागडुजी तसेच साइडपट्ट्या भरण्याचे काम मनपाने हाती घेतले. परंतु लगेच आठ दिवसांनंतर पुन्हा खोदकाम करण्यात आले. या कामामुळे परिसरात ड्रेनेजमिश्रित पाणी येत आहे. तसेच अनेक रहिवाशांच्या घरातील दूरध्वनीचे कनेक्शन कट झाले असून, याबाबत स्थानिकांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप डॉ. हेमलता पाटील यांनी केला.

खोदलेल्या रस्त्यावरच आंदोलन

तक्रारींची दखल न घेता महापालिकेने स्मार्ट सिटीला जलवाहिनीसाठी पुन्हा रस्ता खोदण्यासाठी परवानगी दिल्याने डॉ. पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केेले. या ठिकाणी अचानक जेसीबी लावून मनपाने रस्ता अर्धवट खोदला आहे. स्मार्ट सिटीच्या कारभाराविरोधात डॉ. पाटील यांनी खोदलेल्या रस्त्यावरच स्थानिकांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

The post स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात माजी नगरसेविकेचे उपोषण appeared first on पुढारी.

Exit mobile version