स्मृती जाहल्या कचरामोल…गंगाघाटासह तपोवनात फेकल्या जाताहेत ज्येष्ठांच्या तसबिरी 

पंचवटी ( नाशिक) : ज्या पूर्वजांचे संचित घेऊन माणसं पुढे जातात, यश-कीर्ती कमावतात, अगदी पूर्वजांच्या नावे देणग्याही देतात. समाजात जे जे भूषणावह आहे, ते सर्व करतात. पण खरोखर माणसाला पूर्वजांबद्दल आस्था असते का, की त्या नावाखाली सुरू असतो तो फक्त दिखाऊपणा, असा प्रश्‍न पडावा, अशी परिस्थिती सध्या गोदाघाटासह तपोवनात गेल्यावर अनुभवण्यास मिळते. 

गंगाघाटासह तपोवनात फेरफटका मारला असता इथे दिसतात ते केवळ नाल्यात, कचऱ्यात, नदीपात्रात टाकून दिलेले पूर्वजांचे छायाचित्र, ते पाहून खरोखरच बदलत्या काळात ज्येष्ठांबाबतच्या स्मृती मातीमोल झाल्याचे दिसून येते. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचून पुढील पिढीसाठी केवळ विचारांचीच नव्हे, तर आर्थिक तजवीजही करून ठेवली, त्या ज्येष्ठांच्या तसबिरी नदीकिनारी टाकून देण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. कधीकाळी केवळ देवदेवतांची छायाचित्रे जीर्ण झाली म्हणून नदीकाठी ठेवण्याची प्रथा होती. परंतु आता आजी-आजोबांसह ज्यांचे बोट धरून लहानसे मोठे झाले, त्यांच्या तसबीरीही आता घरात नकोशा झाल्या आहेत. 

सत्तरच्या दशकात मोठी क्रेझ 

साधारण सत्तरच्या दशकात कुटुंबाच्या एकत्र छायाचित्रांची मोठी क्रेझ होती. त्या वेळी आजोबा, वडील व मुलगा अशा तीन पिढ्यांचे एकत्रित छायाचित्र काढून ते घराच्या मुख्य हॉलमध्ये लावण्याची पद्धत होती. याशिवाय आजोबा, पणजोबा ते थेट खापर पणजोबांपर्यंतचे भव्य छायाचित्रही मुख्य हॉलमध्ये लावले जात. शहराच्या गावठाण भागातील जुन्या घरांमध्ये अशी अनेक छायाचित्रे आजही बघावयास मिळतात. परंतु, पूर्वीची मोठी घरे आता आकुंचित झाल्यामुळे जेथे ज्येष्ठच नकोसे झाले, तेथे त्यांच्या छायाचित्रांचे काय महत्त्व. त्यामुळे असे छायाचित्र पहाटे किंवा रात्रीच्या वेळी गंगाघाटावर आणून टाकले जातात. तपोवनातही गोदाकाठी अशा तसबिरी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

जळजळीत वास्तव 

मध्यंतरी एका कार्यक्रमानिमित्त तपोवनात आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी गोदापात्रात टाकलेले एक छायाचित्र चक्क पाण्यात उतरून बाहेर काढले अन् काठावर ठेवले. फोटोतील व्यक्तीने पुढच्या पिढीसाठी काहीच ठेवलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांना असे दिवस आल्याचे श्री. मुर्तडक यांनी सांगताच उपस्थितात हशा पिकला. त्यामुळे छायाचित्रांचे जळजळीत वास्तवही समोर आले. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू