स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम

Deolali Cantonment,

नाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांमधून प्रथम स्थान पटकाविले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शहर स्वच्छतेकडे बारकाईने दिले गेलेले लक्ष, सौंदर्यीकरणावर भर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही केलेल्या कार्यामुळे देवळाली बोर्डाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पदक व सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला. यावेळी डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट्सचे अजयकुमार शर्मा, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. रागेश, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, स्वच्छ भारत मिशन तांत्रिक सल्लागार साजेब सय्यद उपस्थित होते.

स्वच्छ देवळाली-सुंदर देवळाली व हरित देवळाली असे ब्रीद वाक्य बाळगणाऱ्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात गेल्या वर्षापासून बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. रागेश व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये, नामनिर्देशित सदस्या प्रीतम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी वेळोवेळी राबविलेल्या स्वच्छता मोहिमा, आठही वाॅर्डांमध्ये घंटागाड्यांचे योग्य नियोजन, गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा एसटीपी प्लांट, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचऱ्याचे योग्य नियोजन या कामगिरीमुळे देवळाली कॅन्टाेन्मेंट बोर्डाची मान उंचावली आहे. यासाठी अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, आरोग्य निरीक्षक अतुल मुंडे, स्वच्छ भारत मिशन तांत्रिक सल्लागार शाजेब सय्यद, पर्यवेक्षक विनोद खरालीया, रोहिदास शेंडगे, राजू जाधव यांच्यासह कंत्राटी ठेकेदार एन. एच. पटेल यांच्या कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे देवळाली कॅन्टोन्मेंटने ६००० पैकी ५४३३.८८ गुण मिळविले आहे.

देवळाली शहर स्वच्छता व सौंदर्यीकरणावरती दिलेला भर तसेच या कामासाठी आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता व त्यांच्या चमूने अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचे फळ प्रथम क्रमांकासाठी झालेली निवड हे होय.

– डॉ. राहुल गजभिये, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टाेन्मेंट बोर्ड

हेही वाचा :

 

The post स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम appeared first on पुढारी.