स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती 

ओला सुका कचरा www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत धुळे महानगरपालिका मार्फत आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती आराखडा कार्यान्वित करण्यात आला आहे. “नाही आम्हाला काही नकोय” यासाठी जिल्ह्यातील 84 शाळांमधील मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.

ओला व सुका कचरा वर्गीकरणबाबत सातत्य न राहिल्यामुळे शहरातील दैनंदिन कचरा हा प्रत्येक घरातून विलगीकरण केला जात नसल्याने व येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये रँक मिळवण्यासाठी शिक्षण विभागाकडून लोकसहभागाची चळवळ जागृत करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील माध्यमिक एकूण 84 शाळांचे मुख्याध्यापकांची कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या कामासाठी मदत घेण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने याबाबत अधिकाधिक प्रभावीपणे जनजागृती व प्रत्यक्ष कृती करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या सहकार्याने विशेष बैठकीचे आयोजन जो. रा. सिटी हायस्कूल येथे करण्यात आले होते. या बैठकीत उपायुक्त विजय सनेर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने शहरातील कचरा विलगीकरणाच्या कामासाठी मोठा हातभार लागणार आहे. त्याकरीता ही महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली होती. माध्यमिक शिक्षण अधिकारी मोहन देसले त्यांच्या सहाय्यक शिक्षणाधिकारी रंजिता धिवरे तसेच मोहाडी माध्यमिक हायस्कूलचे आर. व्ही. पाटील व त्यांच्या मुख्याध्यापक संघटनेतील शहरातील सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी महानगरपालिकेच्या या कचरा वर्गीकरणाच्या अभियानाकरिता मोलाचा सहभाग घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. त्याचाच भाग म्हणून पुढील आठवड्यापासून शहरातील विविध भागातील विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून ओला व सुका कचरा कसा वर्गीकरण करावा व येणाऱ्या आपआपल्या भागातील कचरा  घंटागाडीमध्ये कसा पाठवावा याबाबत दृढ निश्चय करून आपलं शहर देशपातळीच्या रँकिंगमध्ये नेण्याकरिता आश्वासित केलेले आहे. या बैठकीत समुपदेशनाकरिता असलेले सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणाच्या माध्यमातून सर्व मुख्याध्यापकांचा उत्साह पाहता येणाऱ्या काळामध्ये निश्चितच धुळे शहराला कचरा मुक्त शहराच्या दिशेने घेऊन जाण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महापौर प्रदीप करपे, आयुक्त देविदास टेकाळे, स्थायी समिती सभापती शितल नवले, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्ष नेत्या  कल्पना सुनील महाले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ संगीता नांदुरकर, अभियंता कैलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

हेही वाचा:

The post स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती  appeared first on पुढारी.