Site icon

स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी देशातील प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे उद्दिष्ट नाशिक महापालिकेने ठेवले असून, मनपाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता तसेच स्वच्छता आणि इतर कामकाजाच्या दृष्टीने समन्वय राखण्याकरता प्रत्येक विभागासाठी सहा पालक अधिकार्‍यांची तर विभागीय अधिकार्‍यांची विभागीय समन्वयक अधिकारी म्हणून आयुक्तांनी नेमणूक केली आहे.

केंद्र शासनातर्फे देशातील शहरांमध्ये दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येते. स्पर्धेमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेत मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये देशात 20 वा, तर राज्यात पाचवा क्रमांक मिळविला होता. स्वच्छ सर्वेक्षण 2023 करता देशातील प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे उद्दिष्ट नाशिक मनपाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांच्या आदेशान्वये शहरातील क्षेत्रीय देखरेखीसाठी अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांची मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक विभागाकरता एका पालक अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, नाशिकरोड विभागासाठी मुख्य लेखा परीक्षक बी. जी. सोनकांबळे, सिडको विभागाकरता घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, नाशिक पूर्व विभागाकरता डॉ. अर्चना तांबे, नाशिक पश्चिम विभागाकरता समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त, सातपूर विभागासाठी अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त करुणा डहाळे, तर पंचवटी विभागासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेश महाजन यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सहाही विभागीय अधिकार्‍यांची विभागीय समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या कामकाजाकरता कार्यालयीन समन्वय राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. पलोड आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. आवेश पलोड यांच्याकडे स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत कामांच्या कागदपत्रांची पूर्तता, सर्व विशेष अधिकारी, सर्व पालक अधिकारी, मुख्य समन्वयक अधिकार्‍यांसाबेत कामकाजाविषयी समन्वय ठेवणे तसेच स्वच्छ सर्वेक्षण कार्यालयाचे प्रमुख म्हणून कामकाज करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

पाच विशेष अधिकार्‍यांची नेमणूक
शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र पर्यवेक्षीय नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सेवा व शहर, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभाग, उद्यान अधीक्षक व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा पाच अधिकार्‍यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सर्व प्रभागनिहाय नोडल अधिकार्‍यांनी स्वच्छ सर्वेक्षणकरता सिटी प्रोफाइलमधील शहरातील नमूद स्थानांची देखरेख करून आवश्यक त्या बाबींची पूर्तता संबंधितांकडून करणे व त्याबाबतचा अहवाल त्या विभागाच्या पालक अधिकार्‍यांना सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचा:

The post स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

Exit mobile version