स्वातंत्र्यानंतर गावात पहिल्यांदाच डॉक्टर! आमच्यासाठी जणू देवच..

सटाणा (जि.नाशिक) : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात डॉक्टर आला, अशा प्रतिक्रिया गावातील वृद्धांनी व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला साल्हेर किल्ला व किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली आदिवासी गावे शासनाच्या विविध योजना, तसेच विकासापासून वंचित आहेत. या परिसरात वैद्यकीय सुविधा नसल्यासारखीच आहे. कुणी ग्रामस्थ आजारी पडल्यास त्यांना ६० ते ७० किलोमीटर अंतरावरील सटाणा किंवा कळवण येथे जावे लागते. अंतर जास्त असल्याने रुग्ण टाळाटाळ करतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने काही रुग्णांचा आजार वाढतो, तर काहींचा मृत्यूही होतो.

स्वातंत्र्यानंतर गावात पहिल्यांदाच डॉक्टर 

निसर्गाची मुक्त उधळण असूनही अत्यंत खडतर जीवन जगणाऱ्या आणि वैद्यकीय सेवेपासून वंचित असलेल्या बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील साल्हेर व महारदरपाडा या दोन गावांमध्ये गडसंवर्धनाचे काम करणाऱ्या गडसेवकांनी मालेगाव शहरात रुग्णसेवेचे कार्य करणाऱ्या ‘आपला दवाखाना’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रुग्णसेवा शिबिर घेतले. शिबिरात शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेऊन उपचार करून घेतले.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

डॉक्टरही न थकता देतात आपली रुग्णसेवा

आदिवासी बांधवांची हीच मुख्य अडचण लक्षात घेऊन बागलाण तालुक्यात गडसंवर्धनाचे व्रत घेतलेल्या गडसेवकांनी मालेगावच्या ‘आपला दवाखाना’ या सामाजिक संस्थेशी संपर्क साधून आदिवासी बांधवांसाठी साल्हेरजवळ रुग्णसेवा शिबिर घेण्याची विनंती केली. गडसेवकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संस्थेने साल्हेरजवळील आदिवासी दुर्गम पाड्यांवर कायमस्वरूपी फिरते रुग्णसेवा शिबिर घेण्याचे मान्य केले. त्यानुसार रविवारी (ता. १०) दोन्ही गावांमध्ये शिबिर घेण्यात आले. सकाळी सुरू झालेले रुग्णसेवा शिबिर रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. आदिवासी बांधव विविध आजारांवरील तपासण्यांसाठी येत होते. डॉक्टरही न थकता आपली रुग्णसेवा देत होते. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

आदिवासी बांधवांकडून आभार 
स्वातंत्र्याला ७३ वर्षे झाली, मात्र आम्ही आदिवासी बांधव वैद्यकीय सेवेपासून अद्यापही वंचितच आहोत. गावात आम्ही कधीही डॉक्टर बघितला नाही. मात्र गडसेवकांमुळे स्वातंत्र्यानंतर गावात पहिल्यांदाच डॉक्टर आला, अशा प्रतिक्रिया गावातील अनेक ज्येष्ठ ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. 
या शिबिरात मालेगाव येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद पारिपत्यदार, डॉ. अभय निकम, डॉ. रमेश पटेल, डॉ. सचिन सुराणा यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी ‘आपला दवाखाना’ या सामाजिक संस्थेचे अभय बोरंठ, जयंत गोरवडकर, दिलीप बोथरा (मालेगाव), गडसेवकचे रोहित जाधव, वैभव पाटील, अशोक चौधरी, मयूर भोये, समाधान भोये, योगेश पवार आदींनी परिश्रम घेतले. या वैद्यकीय सेवेमुळे आदिवासी बांधवांनी गडसेवकांचे आभार मानले.