हंगामातील शेवटची गणना; नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये ‘वारकरी’ पक्ष्यांची संख्यावाढ 

नाशिक : नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील ऑक्टोबर ते मार्च या हंगामातील शेवटच्या पक्षीगणनेत वारकरी पक्ष्यांची संख्या तीन हजारांहून अधिक आढळली. गणनेत १०१ प्रकारचे दहा हजार ३४७ पक्ष्यांची नोंद झाली. त्यात नऊ हजार २८५ पाणपक्षी, तर एक हजार ६२ झाडावरील पक्ष्यांचा समावेश होता. गणना पूर्ण झाल्यावर वनाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. 

नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये वारकऱ्यांची संख्यावाढ 
अभयारण्यातील बाभळीच्या वृक्षांवर यंदा रंगीत करकोचाची बाराहून अधिक घरटी आढळली आहेत, तसेच राखी बगळा पहिल्यांदा इथे घरटी बनवत आहे. हळदी-कुंकू, कमळ पक्षी, चमचा, काळा शराटी, जांभळी पाणकोंबडी, दलदल ससाणा, तुतारी, क्रौंच, वेडाराघू, खंड्या, नीलपंख, गडवाल, थापट्या, चक्रवाक आदी पक्षी या वेळी दिसले. महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कर्मचारी संघटनेतर्फे राज्यात झालेल्या आंदोलनात इथे वनपाल अशोक काळे, पक्षीमित्र दत्ताकाका उगावकर, आशा वानखेडे, डी. डी. फाफाळे, चिंतामणी तांबे, प्रमोद मोगल, संजय गायकवाड, एकनाथ साळवे, सुनील जाधव, गंगाधर अघाव, प्रमोद दराडे, अमोल डोंगरे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, विकास गारे, ओमकार चव्हाण, शंकर लोखंडे आदी सहभागी झाले होते. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

दीपाली चव्हाणांना श्रद्धांजली वाहत काळ्या फिती लावून निषेध

पाणी मुबलक असल्याने पक्ष्यांची संख्या स्थिर आहे. आणखी काही दिवस नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास मिळणार आहे. तसेच गुरुवारी दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली वाहून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. 
-अशोक काळे, वनपाल 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता