हक्काच्या घरासाठी १७ वर्षांपासून खेटे! वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांची घोर उपेक्षा

सिडको (नाशिक) : ज्यांच्या साहित्याने दलित चळवळ अजरामर झाली ते नाशिकनगरीचे भूषण वामनदादा कर्डक यांच्या वारसदारांवर हलाखीत जीवन जगण्याची वेळ आली आहे. शासनाने जाहीर करूनही १७ वर्षांपासून न मिळालेल्या घरासाठी शासनदरबारी व आता वारसाहक्क प्रमाणपत्रासाठी खेटे घालण्याची वेळ आली आहे. ज्यांनी आपली संपूर्ण हयात लोकगीतांच्या माध्यमातून जनजागृतीकरिता घालविली आणि शेवटच्या श्वासापर्यंत जे संपूर्ण महाराष्ट्रभर भटकंती करत राहिले, त्या साहित्यिकाचा दत्तक मुलगा आज एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक असून, तो कुटुंबीयांसह सिडकोतील एका छोट्याशा सदनिकेत वास्तव्यास आहे. 

शासनाबाबत त्यांच्या मनातील राग अधोरेखित

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना २००४ मध्ये वामनदादा यांना दोन लाख रुपये आणि शासनातर्फे घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १७ वर्षे उलटून शासनदरबारी अनेकदा खेटे घालूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. कोर्टातही दाद मागितली; परंतु तेथेही अद्याप न्याय न मिळाल्याने पार खचून गेलो आहे. आता कुणापुढे हात पसरायचे हेच कळत नाही, असे सांगताना शासनाबाबत त्यांच्या मनातील राग अधोरेखित होतो. 

याला काय म्हणावे? 

आता मार्चमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकला होत आहे. त्या वेळी हा मुद्दा उपस्थित करून कुणीतरी न्याय मिळवून द्यावा, अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. परिस्थितीमुळे दादांच्या एका नातवाला वैभवला फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेता आले. दादांचा वारसा पुढे सुरू राहावा म्हणून त्याने ‘युगकवी वामनदादा ट्रस्ट’ची स्थापना केली आहे. या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील गरजवंत कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार असल्याचे वैभव कर्डकने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दादांची एक नात सिडको महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती एम.ए.च्या अखेरच्या वर्षाला आहे. त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांची घोर उपेक्षा व्हावी, याला काय म्हणावे? 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

स्मारकाची ही दुरवस्था 

दादांची स्मृती कायम राहावी म्हणून नांदूरनाका आणि जन्मगाव देशवंडी (ता. सिन्नर) येथे त्यांचे स्मारक उभारले जात आहे. मात्र, निधीअभावी ते कामही रखडले आहे. त्या स्मारकाची दुरवस्था झाल्याचे दिसते. दादांच्या जयंती आणि स्मृतिदिनी राज्यभर धुमधडाक्यात कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, आज त्यांचे कुटुंबीय काय हालअपेष्टा भोगतात हे बघण्यास कुणालाही वेळ नाही. निदान दादांना शासनाने मंजूर केलेले घर आम्हाला मिळावे, दादांच्या साहित्यसंपदेचे जतन करावे आणि त्यांच्या स्मारकाची झालेली दुर्दशा थांबवावी, अशी आमची माफक अपेक्षा असल्याचे सांगताना नातू वैभव कर्डक आणि मुलगा रवींद्र कर्डक यांचा कंठ दाटून आला होता.

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच