हरिहर किल्ल्यावर गर्दीचा पूर; गडावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – पावसाळी वातावरण अन‌् हिरवाईने नटलेल्या हरिहर किल्ल्यावर रविवारी सुटीची पर्वणी साधत हजारो पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे किल्यावर गर्दीचा पूर आल्याचे चित्र दिवसभर होते. विशेष म्हणजे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांची गैरसोय झाली. या ठिकाणी गर्दी वाढत असतानाही वनविभागाकडून सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • पावसाळ्यात हरिहर किल्ल्यावर गर्दीचा पूर दिसून येत आहे.
  • रस्त्यावर वाहतूक कोंडी; पर्यटकांनी साधला सुटीचा मुहूर्त
  • पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून दगड पडल्याने एक जण जखमी झाला आहे.
  • गडावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर निर्माण झाला आहे.

तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, हरिहर किल्ला परिसर हिरवाईने नटला आहे. दाट धुके आणि पावसाची रिमझिम अनुभवण्यासाठी पर्यटक किल्ल्यावर गर्दी करत आहेत. रविवारी (दि. 23) सकाळपासून किल्ल्यावर पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनाच्या मोठ्या प्रमाणात रांगा दिसत होत्या. दुपारी त्यात वाढ होऊन वाहतूक कोंडीचा सामानाही पर्यटकांना करावा लागला. दरवर्षी किल्ल्यावर येणाऱ्या वाहनांसाठी वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाकडून पायथ्याला हर्षवाडी परिसरात सशुल्क पार्किंगची सुविधा देण्यात येते येथे 400 ते 500 वाहनांची गर्दी होते. मात्र, यंदा पार्किंगकडे दुर्लक्ष दिसत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने वनखात्याने सध्या चारचाकी कॅम्पर वाहन तैनात केले असून आहे. पर्यटनस्थळावर आवश्यकता भासल्यास ते पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

अरुंद रस्त्यावर अपघाताचा धोका

किल्ल्यावर जाण्या-येण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने येथे एकाच वेळी गर्दी झाल्यास मोठा अपघात होण्याचा धोका आहे. असे असताना या किल्ल्यावर एकाच वेळी पर्यटकाची मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या वेळेत पाऊस नसल्याने पर्यटकांनी मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला. तर दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने गर्दी कमी झाली होती.

हेही वाचा: