नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हरसूल येथील हॉटेलमधील वेटरला जातीवाचक शिवीगाळ करीत त्याच्या दिशेने सात वेळा गोळीबार करून फरार झालेल्या चौघा सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. चौघांपैकी तिघे परजिल्ह्यातील असून संशयितांविरोधात खून, जबरी चोरी, चोरी, मारहाण, दंगल आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान अयनुर शेख (२५, रा. संजीवनगर, अंबड), शेखर दिलीप कथले (२९ सेलू, जि. परभणी), राहूल शाम क्षत्रिय (२४, रा. नांदुरनाका) अशी तिघा सराईत गुन्हेगारांची नावे असून अरबाझ शब्बीर खान पठाण (२३, रा. सेलू, जि. परभणी) असे चौथ्या संशयिताचे नाव आहे.
हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल कश्यपी फोर्ट येथे गुरुवारी (दि. १६) सायंकाळी चार संशयित गेले. तेथे त्यांनी वेटरला जातीवाचक शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यानंतर संशयितांनी वेटरसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. चौघांपैकी एकाने त्याच्याकडील गावठी कट्टा काढून वेटरच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने वेटर पळून गेल्याने त्यास इजा झाली नाही. दरम्यान, हवेत गोळीबार करून संशयित (एमएच २०, सीए ९५९५) क्रमांकाच्या इनोव्हा कारने नाशिकच्या दिशेने पसार झाले. हरसूल पोलिसांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी गंगापूर जकात नाका परिसरात सापळा रचला. संशयितांनी पोलिसांना पाहून वाहन पळवले. त्यामुळे पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करीत गंगापूर गावाजवळ संशयितांना पकडले. संशयितांच्या झडतीत वाहनामध्ये गावठी कट्टा व रिकामे काडतुसे आढळून आले. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी संशयितांविराेधात शस्त्र बागळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर हरसुल पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, अॅ ट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूरच्या पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रवींद्र मोहिते, गणेश रेहरे, सचिन काळे, सचिन अहिरे, नाइक विनायक आव्हाड, अंमलदार मच्छिंद्र वाकचौरे, सुजीत जाधव आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
संशयित सराईत गुन्हेगार
संशयित इम्रान विरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणी व जबरी चोरीप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात हिंगोली जिल्ह्यात खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर शेखर कथले विरोधात परभणी जिल्ह्यातील सेलु पोलिस ठाण्यात मारहाण, दंगलीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तर राहुल विरोधात आडगाव पोलिस ठाण्यातचोरी, जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा –