हातातोंडाशी आलेला घास हिरावला! अज्ञाताच्या षड्यंत्रामुळे संपुर्ण बागच संकटात; शेतकऱ्याचे कष्ट मातीमोल

गिरणारे/गंगापूर (जि. नाशिक) : शेतकरी दिवसरात्र एक करुन, आस्मानी सुलतानी संकटे झेलून मोठ्या कष्टाने शेती करत असतो. यंदाचे वर्ष सर्वच शेतकऱ्यांची परीक्षा पाहाणारे ठरले. कोरोनापाठोपाठ अवकाळी पाऊस, थंडी, वारे यांनी पाठोपाठ शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले, या सगळ्या संकटातून मार्ग काढत वाढवलेली द्राक्ष बाग डोळ्यांसमोर सुकून जाताना पाहणे किती कष्टदायी असेल याची कल्पनाच करवत नाही. ..

निर्यातक्षम द्राक्ष व बागेचे नुकसान

वाडगाव (ता. नाशिक) येथील वामन कसबे या तरुण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातील फवारणी टाकीत अज्ञात व्यक्तीने तणनाशक टाकल्याचा प्रकार आज (ता.१३) उघडकीस आला आहे. दरम्यान, उंचावरील टाकीत काढणीत आलेल्या निर्यातक्षम द्राक्षांवर पोषक द्रव्याचे मिश्रण टाकून त्याची फवारणी झाल्याने नुकसानीत तीन एकर ऐन काढण्यात आलेली निर्यातक्षम द्राक्ष व बागेचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

कर्ज घेऊन उभी केली होती बाग

ही संपूर्ण द्राक्ष बागच काढून टाकावी लागेल, अशी प्रतिक्रिया नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकरी वामन कसबे यांनी दिली. या बागेतील द्राक्षे दरवर्षी निर्यात होतात. यंदाही द्राक्षांना मोठा बहर आहे. मोठ्या कष्टाने, आठ लाख रुपये कर्ज घेऊन बाग उभी केली होती. मात्र, अज्ञाताने फवारणी टाकीत तणनाशक टाकले. ते लक्षात न आल्याने त्याच टाकीत पोषकद्रव्ये टाकून बागेवर झालेल्या फवारणीनंतर आठ दिवसांनी हा दुर्दैवी प्रकार टाकीवरील डागांमुळे, द्राक्षांवर सुकवा येत असल्याने पाने कोमेजून जायला लागल्याने निदर्शनात आला.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

तक्रार दाखल

नुकसानीबाबत नाशिक तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असून, तसेच कृषी विभागाकडे यासंदर्भात पंचनामा करावा असा अर्जही देणार असल्याचे कसबे यांनी सांगितले. कृषी विभागाने या शेतकऱ्यांच्या बागेची पाहणी करून तातडीने अहवाल तयार करावा. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय देऊन नुकसानीबद्दल मदत घ्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.