हिंसक नव्हे धार्मिक व्हावे नाशिक दर्शन

नाशिक गोदाघाट www.pudhari.news

एक शून्य शून्य : गौरव अहिरे

गोदाकाठावर शुक्रवारी (दि.13) रिक्षाचालकाने एका भाविकास बॅटने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या आधीही शहरात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना वाहतूक पोलिस, रिक्षाचालक, टुरिस्ट गाइड, गोदाघाटावर ठाण मांडून असणारे कथित जीवरक्षक आदींकडून फसवणुकीचे, मारहाणीचे प्रकार झाल्याचे घडले आहेत. मात्र, पर्यटक, भाविकांनी त्याची तक्रार न केल्याने हे प्रकार दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या भाविकांना नाशिकच्या धार्मिक-पर्यटन स्थळांऐवजी त्यांची फसवणूक करणारे लक्षात राहतात आणि नाशिकला देवदर्शनासाठी पुन्हा येण्यास त्यांचा विचार होत नसल्याचे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा फटका नाशिकच्या नावासह पर्यटनावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेलाही होत आहे.

कोणत्याही शहराची ओळख तेथील रस्ते, पर्यटन स्थळांसह नागरिकांमुळे होते. रस्ते प्रशस्त व वाहतूक कोंडी विरहीत दळणवळण व्यवस्था असल्यास त्या शहरात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात येतात. तर मुबलक पर्यटन-धार्मिक स्थळे आणि स्थानिक नागरिकांची मदतनीस म्हणून प्रतिमा असल्यास पर्यटकांची रेलचेल कायम असते. त्यामुळे संबंधित शहराची आर्थिक व्यवस्थाही भरभराटीस येते व शहराचे नाव देश-विदेशात सकारात्मकरीत्या पोहोचते. तसे पाहता नाशिकला ऐतिहासिक वारसा लाभला असून, पंचवटीतील तपोवन येथील श्रीरामांचे वास्तव्य, सीतागुंफा, अंजनेरी येथे हनुमानाचे जन्मस्थान, त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर, पांडवलेणी, सोमेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, सप्तशृंगी मंदिर आदी धार्मिक स्थळांसह इतर पर्यटन स्थळांनी नाशिक शहरासह जिल्हा फुलून निघाला आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक, भाविक नाशिकला येत असतात. त्यांना आलेल्या अनुभवानुसार त्यांच्या संपर्कातील इतर पर्यटक नाशिकला येतात. त्यामुळे आलेला प्रत्येक पर्यटक हा नाशिकची महती देश-विदेशातील कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचवत असतो, हे मूळ स्थानिकांनी लक्षात घेणे गरजेचे असते. नाशिकला आलेल्या प्रत्येक पर्यटक, भाविकास चांगला अनुभव आल्यास तो इतरांनाही नाशिकला भेट देण्याचे आवाहन निश्चित करतो, मात्र त्यास वाईट अनुभव आल्यास तो सर्वत्र त्याचा वाईट अनुभवही सांगतो. त्यामुळे इतर पर्यटकांच्या मनात नाशिकला येण्यास किंतु-परंतुचे मोहोळ उभे राहण्याची दाट शक्यता असते. गोदाघाटावर रिक्षाचालकाने पर्यटकास बॅटने मारहाण केल्याने पर्यटकास नाशिकच्या रिक्षाचालकांचा वाईट अनुभव आला. पर्यटकाने पोलिसांकडे तक्रार न केल्याने पोलिसांनीही त्याची दखल घेतलेली नसल्याचे दिसते. त्यामुळे संबंधित रिक्षाचालक निर्धास्त असून पर्यटकही वाईट अनुभव घेऊन त्याच्या गावी गेला असेल. मात्र, या घटनेने तो पर्यटक पुन्हा नाशिकला येण्याची शक्यता कमी असेल हे निश्चित व त्याच्या अनुभवामुळे त्याच्या ओळखीतील पर्यटकही नाशिकला येताना दहा वेळा विचार करतील ही शक्यता नाकारता येत नाही.

याच प्रकारांबरोबर शहराच्या किंवा जिल्ह्याच्या वेशीवर वाहतूक पोलिस ठाण मांडून परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील पर्यटकांच्या वाहनांना लक्ष करून त्यांच्याकडून विनापावती हजारो रुपये गोळा करत असल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या सुरुवातीलाच आर्थिक फटका पर्यटकांना बसतो. त्यानंतर टुरिस्ट गाइड, रिक्षाचालक, गंगेवरील कथित जीवरक्षक, वाहनतळावरील कर्मचारी, काही हॉटेल-लॉजचालक पर्यटकांना गंडवत असल्याचे अनुभव अनेकांना आले आहेत. पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ करून घेण्यासाठी काही जण पर्यटकांना फसवत आहेत किंवा दिशाभूल करत आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांमुळे नाशिकचे नाव खराब होत असून, पर्यटकांना धार्मिक व पर्यटनाचा चांगल्या अनुभवासोबत बदमाश व्यावसायिकांचाही अनुभव मिळत आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यटकांना चांगल्या अनुभवापेक्षा वाईट अनुभवामुळे पश्चातापाची भावना वाढत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक पर्यटकास चांगला अनुभव मिळाल्यास, त्यास नाशिकची खरी ओळख अनुभवयास मिळाली तर तो इतर पर्यटकांनाही नाशिकला भेट देण्याचा आग्रह करेल. त्यामुळे पर्यटकांवर विसंबून असलेल्या व्यावसायिकांचीही आर्थिक भरभराट होण्यास मदत होईल. मात्र, त्यासाठी त्यांनी चांगल्या वर्तुवणुकीवर भर देणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या क्षेत्रात कमी कालावधीत झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेने आलेल्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे नाशिकचे नाव सर्वत्र सकारात्मक पोहोचेल व त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा नाशिककरांना होईल.

हेही वाचा:

The post हिंसक नव्हे धार्मिक व्हावे नाशिक दर्शन appeared first on पुढारी.