ही तर क्रूर चेष्टा! शेतकऱ्यांची कंपनीकडून लाखोंची फसवणूक; दोन महिन्यांनंतर आपबिती उघड

चिचोंडी (जि.नाशिक) : परिसरातील शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात पश्चिम भागात जवळपास अनेक शेतकऱ्यांना फसवणुकीला सामोरे जावे लागून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

दोन महिन्यांनंतर आपबिती होत आहे उघड
येथील कांदा उत्पादक शेतकरी योगेश चव्हाणके, विशाल मढवई, तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपले घरचे खात्रीचे बियाणे पावसामुळे खराब झाल्याने कन्नड, जालना भागातून बियाणे आणले. येवला शहर व तालुक्यातील स्थानिक दुकानदारांनीसुद्धा खात्रीशीर बियाण्यांच्या नावाखाली बियाणे पुडे अव्वाच्या सव्वा भावात विकले. गरज म्हणून प्रतिकिलो पाच हजार रुपये इतक्या महाग दराने बी घेतले. जालना जिल्ह्यातून तसेच स्थानिक व्यावसायिकांच्या विश्वासावर उन्हाळी कांदा बियाणे खरेदी केले होते; मात्र ते लाल कांद्याचे निघाले. तालुक्यात पश्चिम भागात जवळपास अनेक शेतकऱ्यांना फसवणुकीला सामोरे जावे लागून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय औषध फवारणी, खते यासाठी खर्च झाला. उन्हाळ कांद्याचे बियाणे खरेदी केल्यावर ती लाल कांद्याचे बियाणे निघाली आहे. या कांद्याला डेंगळे निघाले असून, त्यात सफेद व दुफाळके निघालेले प्रमाणपण अधिक असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बियाणे कंपनीकडून फसलो गेलो

लाल कांद्याला भाव नसल्याने खर्चही वसूल होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आता आपण बियाणे कंपनीकडून फसलो गेलो आहोत, हे लक्षात येत आहे. मात्र अद्याप तक्रार देण्यास कुणीच पुढे आलेले नाही. संबंधित बियाणे कंपनीवर कृषी खात्याने योग्य ती कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आता फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमधून होत आहे. 

संबंधित कंपनीने नुकसानभरपाई द्यावी

परिसरातील शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा बियाण्यांत फसवणूक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा बियाणे म्हणून महागड्या भावात बियाणे खरेदी केले; परंतु आता लागवड होऊन दोन महिने झाल्यानंतर हा कांदा उन्हाळी कांदा नसून लाल कांदा (रांगडा) निघाला, असे लक्षात येत आहे. आधीच नुकसान झाले असताना काढणीयोग्य लाल कांद्याला भाव नसल्याने संबंधित कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. 

‘उन्हाळ कांदा बियाणे आहे, बिनधास्त घेऊन जा’, असे म्हणून मोठ्या महागड्या दराने बियाणे खरेदी केले. मात्र हे बी लाल कांद्याचे निघाल्याने आमच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्या मुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कांद्याचा दर्जा खराब असल्याने खर्चही वसूल होणार नसल्याने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करून न्याय द्यावा. 
-योगेश चव्हाणके, कांदा उत्पादक 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादनात आत्मनिर्भर झाले पाहिजे. आपल्याला पुरेल यापेक्षा जास्तीचे बियाणे घरीच तयार करावे. या मुळे बियाणे फसवणुकीच्या घटना घडणार नाही. शिवाय दर्जेदार बियाणे विक्रीतून आर्थिक फायदा होईल. या वर्षी घडलेल्या घटनांमुळे घरचे बियाणे उत्पादन वाढवावे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सदैव लढा देऊ, न्याय मिळवून देऊ. 
-भारत दिघोळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना 
 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा