हॉटेलमालक म्हणतायत, ‘नियम पाळतोय, तरीही महापालिकेचा कारवाईचा बडगा’

सिडको (नाशिक) : सिडको परिसरातील काही हॉटेलवर मनपा आयुक्तांनी केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सिडको परिसरातील हॉटेलमालकांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनाचे सर्व नियम आम्ही पाळत आहोत. मात्र केवळ कारवाई केलेली दाखविण्यासाठी मनपा कारवाई करत आहे, ही बाब चुकीची असल्याचे या हॉटेलचालकांचे म्हणणे आहे. यातील काही हॉटेल हे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आहेत.  

मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सिडको परिसरातील शिवाजी चौक, लेखानगर, राणेनगर परिसरातील भाजी मार्केट व आदी भागाची पाहणी केली. या वेळी मास्क परिधान करणेबाबतचे नियम न पाळल्याबद्दल ३० जणांवर कारवाई करत ४१ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तसेच लेखानगर येथील हॉटेल स्पेक्स, हॉटेल उत्तम हिरा चावडी, हॉटेल सचिन या तीन हॉटेलमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला. यापैकी दोन हॉटेल्स या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मालकीच्या आहेत. नियम पाळूनही कारवाई करणाऱ्या मनपा आयुक्तांच्या या दंडात्मक कारवाईबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी मनपा आयुक्तांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन संचालिका डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, स्वच्छता निरीक्षक रावसाहेब मते आदी उपस्थित होते.  

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

अन्यायकारक कारवाई थांबवा. कोरोना काळात अनेक महिने हॉटेल्स बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. असे असताना शासनाने टॅक्स अथवा जीएसटीमध्ये कुठल्या प्रकारची सवलत किंवा मदत दिलेली नाही. असे असताना हॉटेलवर होणारी कारवाई ही चुकीची, तसेच अन्यायकारक आहे. 
-अजिंक्य चुंभळे, युवा सेना पदाधिकारी व हॉटेलमालक 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

नियम पाळूनही, शासनाचे सर्व नियम पाळूनही महापालिका आयुक्तांनी हॉटेलवर धाड टाकून केलेली दंडात्मक कारवाई ही अन्यायकारक आहे. केवळ दिखाव्यासाठी व्यावसायिकांवर कारवाई होत असेल, तर हे कुठेतरी थांबले पाहिजे.  
-संजय चव्हाण, शिवसेना पदाधिकारी व अध्यक्ष, हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन