हॉटेलवर सापळा रचून पाठवला बनावट खरेदीदार; मालेगावला तस्करीसाठीचे दुर्मिळ मांडूळ जप्त

मालेगाव (जि.नाशिक) : तालुक्यातील करंजगव्हाण-टिंगरी रस्त्यावरील मोरझरी परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ मालेगाव वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी मांडूळ विक्री करणाऱ्या टोळीला बनावट ग्राहक तयार करून व्यवहारासाठी बोलवत छापा टाकून मांडूळ जप्त केले. गर्दीचा फायदा घेऊन सशस्त्र टोळीतील मांडूळ विक्री करणारे संशयित फरारी झाले. पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. 

हॉटेलवर सापळा रचून पाठवला बनावट खरेदीदार
सोलापूरचे मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरोचे सदस्य रोहन भाटे यांना मालेगावजवळील महामार्गावरील स्टार हॉटेलमध्ये काही संशयित दुर्मिळ मांडूळ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश येडलावार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे व त्यांच्या पथकाने स्टार हॉटेलवर सापळा रचला. तेथे बनावट खरेदीदार पाठवून खातरजमा केली. विक्रीसाठी आलेले संशयित पसार झाले. कांबळे यांनी मध्यस्थामार्फत संशयितांशी संपर्क साधला असता मांडूळ तस्करी करणाऱ्यांना करंजगव्हाण शिवारात बोलाविले. येथे कांबळे व त्यांचे सहकारी गेले असता गर्दीसह मोठी सशस्त्र टोळी होती.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

बॅग टाकून पसार

गर्दीचा फायदा घेऊन मुख्य चार संशयित मांडूळ असलेली बॅग टाकून पसार झाले. वन विभागाने तिघांना ताब्यात घेतले. येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे, वनपाल अतुल देवरे, बी. एस. सूर्यवंशी, सागर पाटील, वनरक्षक बागूल, रफिक पठाण, तुषार देसाई, अनिल ठाकरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

 

मांडूळ तस्करी करणारे संशयित अजनाळे (जि. धुळे) येथील असावेत. गर्दीत असलेल्या काही संशयितांकडे गावठी कट्टे, तलवारी व शस्त्र होते. वन विभागाचे माझ्यासह अवघे आठ कर्मचारी होते. गर्दीचा फायदा घेऊन संशयित पसार झाले. मात्र मांडूळ जप्त करण्यात आम्हाला यश आले. 
- विलास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मालेगाव