हॉटेलिंगला जात असाल १ एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार कात्री!

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोरोनाकाळात सहा महिन्यांहून अधिक काळ टाळेबंदी लागलेला हॉटेल व्यवसाय पुन्हा रुळावर येण्याच्या आत चक्रव्यूहात सापडला आहे. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, भाजीपाला, आटा, कोळसा सारेच महाग झाले आहे. त्यात कामरागांची पगारवाढ, ग्राहकांची रोडावलेली संख्या यामुळे सारे गणित बिघडले आहे. या स्थितीत दरवाढीशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे हॉटेलिंग महागणार असून, एप्रिलपासून ग्राहकाच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

१ एप्रिलपासून ग्राहकांच्या खिशाला कात्री 
असमान दर कारणीभूत असल्याने हॉटेलिंग व्यवसाय अडचणीत येत असल्याचे हॉटेल मालकांच्या लक्षात आले आहे. प्रामाणिकपणे हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांच्या डोक्यावर कराचा बोजा आहे. त्यांना वेळेचे बंधन आहे. जे गल्लीबोळात खानावळी, नाश्ता सेंटर उघडून बसले आहेत, त्यांना कसलाही कर नाही. तेथे दर कमी ठेवून व्यवसाय सुरू आहे, अशा स्पर्धेला कसे सामोरे जायचे, हा प्रश्‍न हॉटेल व्यावसायिकांपुढे आहे. 

गॅस, तेलाच्या दरवाढीने हॉटेलिंग महाग 
हे संकट असताना ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे सध्या गॅस सिलिंडर, तेल, मसाल्याचे पदार्थ महागले आहेत. त्यात भर म्हणजे सर्वाधिक पसंतीला असणारी तंदूर रोटी आता महागणार आहे. कारण आट्याचे दर दीड हजार रुपये पोत्यावरून दोन हजार ते दोन हजार २०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. भट्टीचा कोळसा महागला आहे. कांदा दर सध्या मर्यादित असले तरी त्याचा कधी भडका उडेल याचा नेम नाही. खाद्यतेलाच्या दरात ४० टक्के वाढ झाली आहे. या गोष्टींचा विचार करून हॉटेल व्यावसायिक दरवाढीच्या विचारात आहेत. दरवाढ केली, तर ग्राहक पाठ फिरवतील, याचीही चिंता व्यावसायिकांना आहे. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

गॅस, तेलाने डोळ्यात पाणी 
व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत एक हजार ६०० रुपयांवर पोचली आहे. ही वाढ डोकेदुखी ठरत आहे. खाद्यतेलाच्या दरात सरासरी ४० टक्के वाढ झाली आहे. सूर्यफूल तेल १६० रुपये, तर मटणाचे दर ६०० रुपये, तर चिकनचे दर २०० रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

गॅस सिलिंडर आणि खाद्यतेल हॉटेल निश्चितीचा पाया ठरतो. त्यातच प्रचंड वाढ झाल्याने हा व्यवसाय संकटात सापडला आहे. दरवाढ करावी तर आधीच ग्राहकांची संख्या रोडावली आहे. दर तसेच ठेवावे तर गणित बसत नाही. अशा कात्रीत हॉटल व्यावसायिक आहेत. 
- संजय शिंदे, संचालक, हॉटेल माखनचोर, पिंपळगाव बसवंत