हॉटेल, खानावळ व्यवसायावर आर्थिक संकट; बाहेरगावहून येणाऱ्यांचे जेवणावाचून हाल 

नाशिक : हॉटेल, उपाहारगृह, खानावळ यांना फक्त पार्सल सुविधेला परवानगी मिळाली आहे. नाशिकमध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता हॉटेल व्यवसायाला पार्सल सुरू ठेवण्याची मुभा आहे. मात्र, व्यावसायिकांना पार्सल सुविधा उपलब्ध असूनही फटका बसत असल्याचे दिसत आहे. बाहेरगावहून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून, त्यांना हॉटेल किंवा खानावळीत जेवावे लागते अशा लोकांनी पार्सल घेऊन जेवायचे कुठे, या प्रश्‍नाने व्यावसायिकांना त्रस्त केले आहे. 

हॉटेल, खानावळ व्यवसायावर आर्थिक संकट
कोरोनाकाळात सगळ्याच क्षेत्राला फटका बसला आहे. हॉटेल, उपाहारगृह, खानावळ यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, छोट्या व्यावसायिकांनाही याचा चांगलाच फटका बसला आहे. पार्सल सुविधा उपलब्ध असली तरी नेहमीपेक्षा फक्त १५ ते २० टक्के व्यवसाय सुरू आहे. यात व्यावसायिकांचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

बाहेरगावहून येणाऱ्यांचे जेवणावाचून हाल 

हॉटेल, खानावळीचे मासिक भाडे, वीजबिल आदींसह इतर गोष्टींचा खर्चच ५० हजारांच्या घरात असल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न पडला असून, खानावळ व्यावसायिक हतबल झाले आहेत. महिन्याचा खर्च निघत नसल्याने व्यावसायिकांची बिकट अवस्था झाली आहे. खानावळीतील जेवल्याने कोरोना होतो. मात्र पार्सल घेणाऱ्याला कोरोना होत नाही हे सरकारने कसे गृहीत धरले, असाही उदिग्न करणारा प्रश्‍न व्यावसायिक विचारत आहेत. दरम्यान, प्रशासनाने पार्सलची सुविधाच हॉटेल व्यावसायिकांना देता येईल, असे नियमावलीत स्पष्ट केल्यामुळे आता हॉटेलबाहेर पार्सल पॉइंटचे फलक दिसायला लागले आहेत. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

-
खानावळीत बसून जेवणाला परवानगी नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच महाविद्यालये पुन्हा बंद झाल्यामुळे डबे कमी झाले आहेत. बाहेरगावहून येणाऱ्या ग्राहकांना पार्सल घेऊन जेवण करायचे कुठे, असा प्रश्‍न पडतो. कोरोनाची भीती असल्यामुळे पार्सल घेणेही कमी केल्यामुळे जवळपास ८० टक्के व्यवसाय ठप्प झाला आहे. 
- श्रीकांत सिंग, खानावळ व्यावसायिक