होणाऱ्या पत्नीच्या शोधात फिरतो नवरदेव! नाशिकमध्ये वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीची अनोखी परंपरा

नाशिक : नाशिकमध्ये होळी, धुलिवंदन, वीर मिरवणूक, रंगपंचमी  मोठ्या उत्साहात साजरी केली जाते; मात्र गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही या उत्सवांवर कोरोनाचे सावट हेच. कोरोना रुग्णांची नाशिकमध्ये वाढती संख्या पाहता पोलीस प्रशासनाने धुलीवंदन तसेच नाशिकमधील वीर मिरवणुकांवर बंदी घातली आहे. सध्या तरी पूर्वापार पासून चालत आलेल्या या परंपरा यंदा जरी होणार नसल्या तरी तुम्हाला माहित आहे का? नाशिकची धुलिवंदनला एक अनोखी परंपरा आहे आणि ती म्हणजे वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक. अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु असून हा दाजीबा नवसाला पावणारा देव मानला जातो. यावेळी अंगाला हळद लावून डोक्यावर देवाचा मुकुट घेत बाशिंग बांधून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो. नेमकी काय परंपरा आहे ही?

वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक! धुलिवंदनाची अनोखी परंपरा
नाशिकमध्ये वीरांची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. धुलिवंदन म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी शहराच्या विविध भागातून वीर नाचवले जातात. मुख्य मानाचा असलेल्या दाजीबा वीराचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून भाविक येतात. विवाह इच्छुक मुला-मुलींचे विवाह जमत नसतील अशांनी या वीराला बाशिंग वाहण्याची परंपरा आहे. या पारंपारिक मिरवणुकीमागे आख्यायिका अशी आहे, की हळद लागलेल्या नवरदेवाला मृत्यू आला आणि त्याची लग्नाची इच्छा अपूर्णच राहिली. यामुळे डोक्यावर देवाचा मुकूट अन् बाशिंग बांधून अंगाला हळद लावून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो. या परंपरेनुसार दाजीबा वीर सर्वांचे विघ्न दूर करतो असा समज आहे.

सुमारे २०० वर्षांची परंपरा

या मिरवणुकीमागे २०० वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. दाजीबा वीराचे दरवर्षी मानकरी ठरलेले असतात. त्यांना पारंपारिक पोशाखात सजविण्यात येते. नाशिकच्या रंगपंचमीमधील रहाड परंपरेप्रमाणेच ही वीर मिरवणूक परंपराही प्रसिध्द आहे. यामध्ये धुलीवंदनाला जुने नाशिक परिसरातून बाशिंगे दाजीबा विराची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते.
नाशिकच्या बुधवारपेठेतून वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीचा समारोप दुसऱ्या दिवशी पहाटे केला जातो.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

जुने नाशिक परिसरातून फिरवितात मिरवणूक

संपूर्ण जुने नाशिक परिसरात हा मिरवणूक फिरवली जाते. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे  दाजीबा वीर निघाल्यानंतर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. बाशिंगे वीराची मिरवणूक निघून म्हसरूळ टेक, संभाजी चौक, टाकसाळ लेन, दूधबाजार, मेनरोड, रविवार कारंजामार्गे रामकुंडावर जाते. तेथे विधिवत पूजा करण्यात येते आणि तेथून पुन्हा परतीच्या मार्गाने बुधवार पेठेत येते. ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता संपते.

अंगाला नवरदेवाप्रमाणेच हळद

दाजिबा बाशिंगे वीराला देवाचे वस्त्र परिधान केले जातो. नंतर त्याच्या डोक्यावर देवाचा मुकुट चढविला जातो आणि बाशिंग बांधले जाते. डोक्यावरील मुकुट आणि बाशिंग दोरखंडाच्या सहाय्याने कमरेच्या भोवती बांधलेले असते. दोन्ही हातांच्या मनगटांना आणि गळ्यात फुलांच्या माळा बांधतात. तसेच, अंगाला नवरदेवाप्रमाणेच हळद लावण्यात आलेली असते. मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून हा वीर नृत्य करीतच जातो. मध्यरात्रीनंतर मिरवणुकीचा समारोप होतो. बाशिंगे वीर नवसाला पावणारे असल्याने त्यांची घरोघरी मनोभावे पूजा केली जाते.  या वीराचे मूळ स्थान दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे आहे. असे सांगितले जाते.

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...

वीरांना रामकुंडावर स्नान घालण्याची प्रथा

खोबऱ्याच्या वाटीतील देवांना रामकुंडात स्नान घालण्याची प्रथा आहे. या वीरांचे अनेकांच्या घरी टाक आहेत. धुलिवंदनच्या दिवशी रामकुंडावर नेऊन स्नान घालण्याची प्रथा आहे.यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येतात. त्यावेळी तर रामकुंडास परिसराला जत्रेचे स्वरूप होते. आदल्या दिवशी रामकुंडावर पेटविण्यात आलेल्या होळी भोवती प्रदक्षिणा मारतात.  

निर्बंध लागू

नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता पंचवटी, जुने नाशिक परिसरात होणाऱ्या रहाड रंगपंचमीवरही बंदी घालण्यात आली असून सहायक पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी अधिसूचना रविवारी (ता.२८) जारी केली आहे. सोमवारी (ता. २९) आणि शुक्रवारी (ता. २ एप्रिल) रोजी हे निर्बंध लागू असतील, असे अधिसूचनेत म्हटले आहे.