होळी उत्‍सवावर यंदा पाणी! रंगपंचमीही नाहीच, सण-उत्‍सवांवर संक्रांत   

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून विविध सण-उत्‍सवांवर पाणी फेरले जात आहेत. नववर्षाला सुरवात झाल्‍यानंतर कोरोना रुग्‍णसंख्येच्‍या घटत्‍या संख्येमुळे यंदा तरी सण-उत्‍सव साजरे करण्याची संधी मिळेल, असा आशावाद व्‍यक्‍त होत होता; परंतु पुन्‍हा बाधितांच्‍या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे विविध निर्बंध आणले आहेत. त्‍यातच येत्‍या २८ मार्चला होळी उत्‍सवावर मर्यादा येण्याची चिन्‍हे आहेत, तर रंगपंचमी उत्‍सव यंदा साजरा करता येणार नसल्‍याची सध्याची स्‍थिती आहे. 

होळी उत्‍सवावर मर्यादा; यंदा रंगपंचमी नाहीच 

गेल्‍या वर्षी मार्चअखेरीस कोरोनाचा पहिला बाधित आढळला होता. यादरम्‍यानच होळी सण व त्‍यापाठोपाठ येणारा रंगपंचमीचा उत्‍सव जल्‍लोषात साजरा झाला होता. या रंगोत्‍सवात ‘गो कोरोना गो’ गाण्यावर थिरकण्याचा आनंद तरुणाईने लुटला होता; परंतु त्‍यानंतर परिस्‍थिती चिंताजनक होत गेल्‍याने नंतरचे सण-उत्‍सव साजरे करण्यावर बंधने आली होती. २०२० वर्षाचे शेवटचे दोन महिने व नववर्षाची सुरवात दिलासादायक राहिल्‍याने कोरोना रुग्‍णांच्‍या संख्येत घट होत चालली होती. त्‍यामुळे मकरसंक्रांती सणाचा गोडवा वाढल्याचे चित्र बघायला मिळाले होते.

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे सण-उत्‍सवांवर संक्रांत 

आता कोरोनाने पुन्‍हा डोके वर काढल्‍याने सण-उत्‍सवांवर निर्बंध येणार आहेत. त्‍यातच येत्‍या २८ मार्चला होळी सण मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागण्याची वेळ ओढावली आहे. मोठी गर्दी होत असलेल्‍या रंगपंचमी उत्‍सवाला यंदा परवानगी मिळणार नसल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

व्‍यावसायिकांचा हिरमोड 
होळी व रंगपंचमीवर आधारित दुकाने १५ दिवस पूर्वीपासून थाटली जातात; परंतु यंदा कोरोनाच्‍या संकटामुळे व्‍यावसायिकांचाही हिरमोड झाला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ व उपनगरीय भागांतील दुकानांमध्ये विविध रंग, पिचकारी व अन्‍य साहित्‍य विक्री केली जायची. परंतु यंदा विक्रेत्‍यांकडून अत्‍यंत मर्यादित स्‍वरूपात मालाची खरेदी केल्‍याने दुकानात कमी प्रमाणात वस्‍तू विक्रीसाठी उपलब्ध केल्‍या आहेत.