हौशी समर्थकांचा कारनामा! मंत्रिपुत्राची सोशल मीडियावर एक पोस्ट अन् झालं भलतंच; नागरिकांचा मनस्ताप

सिडको (नाशिक) : सिडको परिसरात मंत्रिपुत्राने सोशल मीडियावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कोणीही बॅनर्स लावू नये, असे आवाहन करणारे पोस्ट टाकली; पण त्यांच्या समर्थकांनी मात्र जे केले त्यामुळे करायला गेले एक अन् झालं भलतंच अशीच स्थिती झाली. वाचा नेमके काय घडले?

हौशी समर्थकांची करामत चांगलीच चर्चेला

सिडको परिसरात मंत्रिपुत्राचा वाढदिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कोणीही बॅनर्स लावू नका असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. हौशी समर्थकांनी ते मान्य केले. पण त्यांच्या स्टाईलनेच. जागोजागी बॅनर लावू नका, याचे इतके फलक लावले की त्यामुळेच नागरिकांचीच कोंडी झाली.
मंत्रिपुत्राच्या समर्थकांनी सर्रासपणे दुर्लक्ष करत सिडकोत भररस्त्यात बॅनर लावले आहेत. त्यामुळे इतरांना अडथळा न करण्याचे आवाहन करणारे फलकच येथे अडथळा ठरत आहे. मंत्रिपुत्राच्या या ‘अविष्काराबद्दल’ समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक हौशी समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर सिडको परिसरात लावल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना त्याचा अडथळा होऊ लागला आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

कोरोना परिस्थितीत कोणीही आपल्या वाढदिवसाचे बॅनर लावू नये, अशा प्रकारचे आवाहन जिल्ह्यातील एका मंत्रिपुत्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. असे असतानाही त्या मंत्रिपुत्राच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनच्या काही हौशी समर्थकांनी या आवाहनाला न जुमानता सिडकोतील मुख्य रस्त्यावर होर्डिंग लावून नेमकी उलटी कृती करीत मंत्रिपुत्राच्या आवाहनाला आव्हान दिले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली